हंपी

हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे.

मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक "किल्ले, नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा" समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान (austere, grandiose site) असे केले आहे.

हंपी येथील स्मारकांचे समूह
युनेस्को जागतिक वारसा स्थळ
हंपी
स्थान विजयनगर जिल्हा, कर्नाटक, भारत
समाविष्ट विरूपाक्ष मंदिर
जागतिक वारसा साइट निवडीसाठीचा निकष सांस्कृतिक: i, iii, iv
संदर्भ २४१
सूचीकरण 1986 (10वे सत्र)
चिंताजनक १९९९–२००६
क्षेत्रफळ ४,१८७.२४ हे
बफर झोन १९,४५३.६२ ha
संकेतस्थळ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण - हम्पी
स्थान निर्देशक 15°20′04″N 76°27′44″E / 15.33444°N 76.46222°E / 15.33444; 76.46222
हंपी is located in कर्नाटक
हंपी
हंपीचे स्थान
हंपी is located in भारत
हंपी
हंपी (भारत)

स्थान

हंपी 
हंपी खडकाळ प्रदेशात वसलेले आहे. वरील: पार्श्वभूमीत तुंगभद्रा नदीसह विजयनगर बाजारातील अनेक अवशेषांपैकी एक

हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. हे ठिकाण कर्नाटक राज्य महामार्ग १३० च्या जवळ आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

हंपी नावाची व्युत्पत्ती पंपापासून आहे. पंपा हिंदू देवी पार्वतीचे एक नाव आहे. पौराणिक कथेनुसार पार्वतीने (जी शंकराची पूर्वीची पत्नी सतीचा पुनर्जन्म आहे) शंकराशी लग्न करण्याचा संकल्प केला. तिच्या आईवडीलांनी हे कळल्यावर त्यांनी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु पार्वतीने आपला हट्ट सोडला नाही. योगसाधनेत गर्क आणि जगापासून परावृत्त अशआ शंकराला जागृत करण्यासाठी आणि त्यांचे लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी पार्वतीने देवतांना मदतीसाठी आवाहन केले. देवराज इंद्राने शंकराला ध्यानातून जागृत करण्यासाठी कामुक प्रेम आणि आकर्षणाचा देव कामदेव यास पार्वतीच्या मदतीस पाठवले. कामदेवाने शंकरावर कामबाण सोडल्यावर शंकर विचलित होतो.. तपस्या भंग झाल्याने क्रोधित झालेल्या शंकराने आपल्या कपाळावरचा तिसरा डोळा उघडून कामदेवाला जाळून राख करून टाकले. यानंतरही पार्वतीने निराश न होता शंकराचे प्रेम मिळविण्यासाठी त्यांच्याच सारखे तपस्वी जीवन जगणे सुरू केले. शंकराने पार्वतीच्या संकल्पामागचे कारण व तिचे खरेच आपल्यावर प्रेम आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी वेषांतर करून पार्वतीची भेट घेतली आणि शंकराच्या (स्वतःच्याच) क्रोधी, रागीट स्वभाव, त्याचे जंगलात भणंगासारखे राहणे, संसाराकडे बिलकुल लक्ष नसणे, इ. नकारात्मक गोष्टींचे वर्णन केले. त्यायोगे पार्वती आपला नाद सोडून देईल असे त्यास वाटत असते. हे सगळे ऐकूनसुद्धा पार्वती आपल्या निश्चयावर ठाम राहते. पार्वतीच्या संकल्पामागे प्रेम आणि आदर असल्याचे कळल्यावर भगवान शिव शेवटी तिचा स्वीकार केला आणि त्यांनी लग्न केले. शिव आणि पार्वतीच्या विवाहानंतर कामदेवाला नंतर जिवंत करण्यात आले. स्थल पुराणानुसार, पार्वती (पम्पा) हिने तपस्वी शिवाला जिंकण्यासाठी आणि गृहस्थ जीवनात परत आणण्यासाठी हेमाकुटा टेकडीवर, आता हंपीचा एक भाग असलेल्या, तिच्या तपस्वी, योगिनी जीवनशैलीचा पाठपुरावा केला. शिवाला पंपापती (म्हणजे "पंपाचा पती") असेही म्हणतात. हेमाकुटा टेकडीजवळील नदी पंपा नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. पम्पा हा संस्कृत शब्द, कन्नड शब्द हंपा मध्ये बदलला आणि पार्वती ज्या ठिकाणी शिवाचा पाठलाग करत होती ते ठिकाण हम्पे किंवा हम्पी म्हणून ओळखले जाऊ लागले.

हा प्रदेश पंपा-क्षेत्र, किष्किंधा-क्षेत्र किंवा भास्कर-क्षेत्र म्हणूनही ओळखला जातो.

प्राचीन ते इ.स. १४वे शतक

या प्रदेशाचा उल्लेख हिंदू महाकाव्य रामायणाच्या किष्किंधा अध्यायांत आहे. रावणाने अपहरण केलेल्या सीतेच्या शोधात राम आणि लक्ष्मण दक्षिणेकडे प्रवास करीत असताना हनुमान, सुग्रीव आणि वानर सेना त्यांना येथे भेटतात. महाकाव्यात वर्णन केलेल्या ठिकाणाशी हंपी क्षेत्राचे बरेच जवळचे साम्य आहे. रामायणातील या उल्लेखांमुळे यात्रेकरूंना येथे येत असतात.

मध्ययुगीन काळात हे ठिकाण पम्पाक्षेत्र म्हणून ओळखले जात असे. १८०० च्या दशकात कर्नल कॉलिन मॅकेन्झी नावाच्या अभियंत्याने या प्रदेशाबद्दल माहिती प्रसिद्ध केली.

१४व्या शतकात हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. या शहराभोवती रक्षणासाठी तटबंदी होती. फारसी आणि युरोपीय प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिहासवृत्तात असे म्हणले आहे की हंपी हे तुंगभद्रा नदीजवळचे एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते, ज्यामध्ये असंख्य मंदिरे, शेती आणि व्यापारी बाजार होते. इ.स. १५०० पर्यंत, हंपी-विजयनगर हे मध्ययुगीन काळातील बीजिंग नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर समजले जात होते. त्यावेळेस भारतातील सर्वात श्रीमंत शहरही होते. येथे इराण आणि पोर्तुगालमधील व्यापाऱ्यांनी व्यापार मांडला होता. मुस्लिम सल्तनतांच्या युतीने विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. १५६५ मध्ये सल्तनती सैन्याने हंपी शहर जिंकून पूर्णतया लुटून नेले आणि जाताजाता शहर नष्ट केले. त्यानंतर हंपीला विशेष वस्ती राहिली नाही व हे भग्नावशेष अनेक शतके दुर्लक्षित अवस्थेत राहिले.

इस पू २६९-२३२ च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या बेल्लारी जिल्ह्यातील नित्तूर आणि उदेगोलन येथील सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरुन लक्षात येते की हा प्रदेश इसपू ३ऱ्या शतकादरम्यान मौर्य साम्राज्याचा भाग होता. पुरातत्त्व संशोधन आणि उत्खननात येथे ब्राह्मी लिपीतील शिलालेख आणि इ.स.च्या दुसऱ्या शतकातील चिनी मातीचा ठसा सापडला आहे. ६व्या आणि ८व्या शतकादरम्यानच्या, बादामी चालुक्यांच्या शिलालेखात या शहराचा उल्लेख पंपापुरा असा आहे.

१०व्या शतकाच्या सुमारास कल्याण चालुक्य साम्राज्यात हंपी धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र होते, एका चालुक्य शिलालेखात राजांनी विरूपाक्ष मंदिराला जमीन अनुदान दिल्याचा उल्लेख आहे. असे हंपादेवी, इथर देवता आणि मंदिरांना भेटवस्तू दिल्याचा उल्लेख असणारे ११ ते १३व्या शतकातील अनेक शिलालेख सापडतात. इ.स. ११९९ च्या शिलालेखानुसार १२व्या आणि १४व्या शतकादरम्यान, दक्षिण भारतातील होयसळ साम्राज्यातील हिंदू राजांनी दुर्गा, हंपादेवी आणि शिवाची मंदिरे बांधली. हंपी हे तत्कालीन सम्राटांचे दुय्यम निवासस्थान होते. होयसाळ राजांपैकी एक हंपेया-ओडेया किंवा "हंपीचा स्वामी" म्हणून ओळखला जात असे. बर्टन स्टीनच्या संशोधनानुसार होयसाळ-काळातील शिलालेख हंपीला विरूपाक्षपट्टण, विजया विरूपाक्षपुरा यांसारख्या पर्यायी नावांनी संबोधतात.

पौराणिक आणि ऐतिहासिक महत्वाबरोबरच हंपीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. येथील विरूपाक्ष मंदिर, सक्रिय आद्य शंकराचार्य-संबंधित मठ आणि विविध स्मारके असलेले हम्पी हे एक आधुनिक काळात महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे.

१४ वे शतक आणि नंतर

इ.स.च्या १४व्या शतकाच्या सुरुवातीस अफगाण, तुर्की आणि ताजिकी सरदारांनी उत्तर भारत जिंकून तेथील राज्यांचा नायनाट केला होता. त्यानंतर लगेचच अलाउद्दीन खिलजी आणि १३२६मध्ये मुहम्मद बिन तुघलक यांनी दक्षिण भारतावर स्वाऱ्या केल्या आणि कर्नाटकातील होयसळ साम्राज्य आणि त्याची राजधानी द्वारसमुद्र लुटुन उद्ध्वस्त करून टाकले.

होयसाळ साम्राज्याच्या पतनानंतर या टोळधाडीने पाठ फिरवल्यावर उत्तर-मध्य कर्नाटकात कंपिली राज्य उदयास आले. हंपीपासून ३३ किलोमीटर (२१ मैल) अंतरावर राजधानी असलेले हे हिंदू राज्य अल्पायुषी ठरले. मुहम्मद बिन तुघलक पुन्हा दक्षिणेवर चालून आला व त्यात कंपिलीच्या राज्याचा अंत झाला. आपले सैन्य तुघलकाच्या सैन्याकडून पराभूत असल्याचे पाहून कंपिलीच्या हिंदू स्त्रियांनी जौहर (सामूहिक आत्महत्या) केला. यानंतर काही वर्षांतच इ.स. १३३६ मध्ये कंपिली राज्याच्या अवशेषांमधून विजयनगरच्या साम्राज्याचा उदय झाला. हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध, समृद्ध हिंदू साम्राज्यांपैकी एक समजले जाते. विजयनगरच्या सम्राटांची सत्ता २०० वर्षांहून अधिक काळ चालली.

विजयनगर साम्राज्याने आपली राजधानी हंपीभोवती बांधली आणि त्याला विजयनगर असे नाव दिले. बऱ्याच इतिहासकारांनी असे सुचवले आहे की विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहरराय पहिला आणि बुक्कराय पहिला हे दोन भाऊ उत्तर भारतातील मुस्लिम आक्रमणे रोखण्यासाठी तुंगभद्र प्रदेशात तैनात असलेल्या होयसळ साम्राज्याच्या सैन्यात सर्दार होते. काहींचा असा दावा आहे की हे तेलुगू असून त्यांनी होयसळ साम्राज्याच्या अधोगतीचा फायदा घेत साम्राज्याचा उत्तरेकडील भाग ताब्यात घेतला. विद्यारण्य कलाजन, विद्यारण्य वृत्तांत, राजकालनिर्णय, पितामहासंहिता, शिवतत्त्वरत्नाकर यासारख्या काही ग्रंथांनुसार, ते काकतीय राजा प्रताप रुद्रच्या खजिन्याचे अधिकारी होते. मुहम्मद बिन तुघलकचा एक सरदार बहा-उद्दीन गुरशाप त्याच्यापासून फुटून प्रताप रुद्रच्या दरबारात आश्रयास होता. गुरशापचा माग घेत आलेल्या तुघलकने प्रताप रुद्रचा आणि त्याबरोबर काकतीयांचा नाश केला. त्या वेळी हरिहर आणि बुक्क आपल्या शिबंदीसह विजयनगर तथा हंपी प्रदेशात आले. शृंगेरी शारदा पीठाचे १२वे जगद्गुरू, विद्यारण्य यांनी त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेतले आणि त्यांचा राज्याभिषेक केला. इ.स. १३३६ मध्ये या शहराला विद्यानगर असे नाव होते. हरिहर आणि बुक्क यांनी येथे आपली राजधानी वसून तेथील पायाभूत सुविधा आणि मंदिरांचा विस्तार केला.

निकोलस गियर आणि इतर विद्वानांच्या मते, इ.स १५०० पर्यंत हंपी-विजयनगर हे बीजिंग नंतर जगातील दुसरे सर्वात मोठे मध्ययुगीन-युगातील शहर होते आणि कदाचित भारतातील सर्वात श्रीमंत शहर होते. येथील अमाप संपत्तीने १६व्या शतकात दख्खन, पर्शिया आणि गोव्याच्या पोर्तुगीज वसाहतीतील व्यापाऱ्यांना आकर्षित केले. विजयनगरच्या शासकांनी कला, विद्या आणि शिक्षणविकासाला चालना दिली आणि त्याचबरोबर बलाढ्य सैन्य तयार करून आपल्या उत्तर आणि पूर्व सीमांवरील अनेक सल्तनतांना झुंज देत दूर ठेवले. त्यांनी रस्ते, जलकुंभ, शेती, धार्मिक इमारती आणि तत्सम सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली. युनेस्कोने म्हणण्यानुसार यां "किल्ले, नदीकाठची रम्य ठिकाणे, राजवाडे आणि धार्मिक इमारती, मंदिरे, तीर्थस्थाने, असंख्य स्तंभ असलेले मंडप, स्मारके, गोपुरे, चेकनाके, तबेले, पाणी वाहून नेणारे कालवे आणि इतर अनेक" गोष्टींचा समावेश आहे. हे क्षेत्र बहु-धार्मिक आणि बहु-जातीय होते; त्यात हिंदू आणि जैन स्मारके एकमेकांच्या शेजारी होती. इमारतींमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतीय हिंदू कला आणि स्थापत्यकलेचे पालन केले गेले जे ऐहोल-पट्टडकल शैलीशी संबंधित होते, परंतु हंपीच्या बांधकाम व्यावसायिकांनी कमळ महाल, सार्वजनिक स्नानगृह आणि हत्तींच्या तबेल्यांमध्ये भारतीय वास्तुकलेचे घटक देखील वापरले. पोर्तुगीज आणि पर्शियन व्यापाऱ्यांनी लिहून ठेवलेल्या ऐतिहासिक आठवणींनुसार, हंपी एक महानगर होते. याचे वर्णन त्यांनी "सर्वात सुंदर शहरांपैकी एक" असे केले आहे.

गरुड दगडी रथ आणि विठ्ठल मंदिर गोपुरम १८५६ (डावीकडे) आणि २०१६ मध्ये.

एकीकडे समृद्धी आणि पायाभूत सुविधा वाढ असताना सीमेवर मुस्लिम सल्तनती आणि विजयनगर साम्राज्य यांच्यातील युद्ध चालूच होते. १५६५मध्ये, तालिकोटच्या लढाईत, मुस्लिम सल्तनतांनी विजयनगर साम्राज्याविरुद्ध युती केली आणि निकराची चढाई केली. त्यांनी युद्धात पकडलेल्या राजा आलिया रामा रायाला पकडून त्याचा शिरच्छेद केला, पराजित हंपी आणि विजयनगर महानगरांमध्ये सुलतानी सैन्याने धुमाकूळ घातला आणि शहराचा नाश केला. युद्धानंतर सहा महिने शहराची आणि आसपासच्या प्रदेशाची लुटालूट आणि जाळपोळ सुरू होती. शेवटी बळकावण्यासारखे काही न राहिल्यावर शहराच्या भग्नावेषांवरून हे आक्रमक बाजूला झाले. या अतोनात प्रमाणात झालेल्या नाशातून बचावलेल्या इमारती आता येथ उरल्या आहेत.

पुरातत्त्व स्थळ

हंपी 
हम्पी नकाशा, १९११ सर्वेक्षण

दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला.

ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले.

१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत.

१८८० च्या दशकाच्या सुरुवातीस देवराया दुसऱ्याच्या (१४२४-१४४६) दरबारातील पर्शियन दूत अब्दुल रझ्झाक यांनी लिहिलेल्या संस्मरणांचा अनुवाद प्रकाशित झाला. यात हंपीजवळच्या ओसाड जागेतील काही स्मारकांचे वर्णन केलेले आहे. या पहिल्यांदाच झनाना सारख्या काही अरबी शब्दांचा वापर आहे. इतर स्मारकांना आणि अवशेषांना यानंतर आधुनिक नावे देण्यात आली. ब्रिटिश भारतातील मद्रास प्रेसिडेन्सीच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी अलेक्झांडर रिया यांनी १८८५ मध्ये या जागेचे पहिले सर्वेक्षण प्रकाशित केले.रॉबर्ट सेवेलच्या १९०० मध्ये प्रकाशित अभ्यासपूर्ण ग्रंथ अ फरगॉटन एम्पायर द्वारे हंपीकडे विद्वानांचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या स्वारस्यामुळे रिया आणि त्याचा उत्तराधिकारी लॉन्गहर्स्ट यांनी हंपी समूहाच्या स्मारकांची साफसफाई आणि दुरुस्ती करण्यास सुरुवात केली.

विजयनगर साम्राज्य आणि त्यापूर्वीच्या काळातील ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या हे ठिकाण महत्त्वपूर्ण समजले जाते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग या भागात उत्खनन करत आहे.

वर्णन

दगडी रथ
हंपी येथील मंदिराचे प्रवेशद्वार
हंपी येथील तराजू
शशिवेकालू गणेश स्मारक

हंपी टेकड्या आणि डोंगरांच्या मध्ये वसलेले आहे. मूळ शहर तुंगभद्रा नदीकाठी असून येथील अवशेष नदीच्या आसपास विखुरलेले आहेत. येथील इमारती व मूर्त्या आसपासच्या डोंगरांतील ग्रॅनाइटच्या दगडांनी बनवलेल्या आहेत..

या परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ४१.५ चौरस किमी (१६.० चौ. मैल) प्रदेशात सुमारे १,६०० विविध इमारती, स्मारके आणि इतर अवशेष क्रमांकित केलेले आहेत. यातील बव्हंश अवशेष विजयनगर साम्राज्याच्या काळात इ.स. १३३६-१५७० दरम्यान बांधली गेली होती. यांतील काहींचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात केला गेला आहे.

हंपी परिसराचे साधारण तीन भाग आहेत. बर्टन स्टीन आणि इतर संशोधकांनी या भागांना पवित्र स्थळ (सेक्रेड सेंटर), शहरी गाभा (अर्बन कोर) आणि विजयनगर शहर अशी नावे दिली.

नदीकाठच्या मंदिरांच्या परिसरात येथील सगळ्या जुनी मंदिरे आणि विजयनगर साम्राज्याच्याही आधीची स्मारके आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात ६०पेक्षा अधिक उद्ध्वस्त मंदिरे आहेत. ही विजयनगर काळातील आहेत. येथे रस्ते, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या, मंडप, बाजार, मठ, , इ. इमारती आहेत. या स्मारकांची, मंदिरांची आणि स्मारकांची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या ७२ शिलालेखांचा आधार घेतला गेला आहे.

हंपीमधील बहुतेक मंदिरे हिंदू आहेत तसेच येथील इमारती आणि स्मारकांतून हिंदू देवतांचे चित्रण आणि शिल्पे दिसतात. याशिवाय पुराणांमधील संदर्भ आणि कलाकृतीही दसून येतात. या सगळ्यांचे बांधकाम द्रविडी शैलीत आहे. याबरोबरच ११व्या ते १४व्या शतकातील होयसळ साम्राज्याच्या कलांची छटाही दिसून येते. राममंदिराचे खांब आणि विरूपाक्ष मंदिर संकुलाचे छत यांत हे विशेष आठळे. इतकेच नव्हे तर काही नवीन इमारतींमध्ये भारतीय-इस्लामिक शैलीही दिसून येते. राणीचे अंतःपुर, हत्तींचे तबेले, इ. इमारती याचे नमूने आहे.

याशिवाय ६ जैन मंदिरे आणि एक मशीद तसेच थडगेही येथे आहेत.

हिंदू स्मारके

विरुपाक्ष मंदिर
विजय विठ्ठल मंदिराचे अवशेष
विरुपाक्ष मंदिर

विरूपाक्ष मंदिर आणि बाजार संकुल

विरूपाक्ष मंदिर हे येथील सर्वात जुने देवस्थान आहे, येथे आलेले सगळे यात्रेकरू आणि पर्यटक येथे येतात. आजही येथे पूजा-अर्चना होते. जवळच्या शिव, पंपा आणि दुर्गा मंदिरांचे काही भाग ११व्या शतकापासून उभे आहेत. विजयनगर काळात त्यांंचा विस्तार करण्यात आला. या मंदिर समूहास उंच गोपूर असून येथे अद्वैत परंपरेतील विद्यारण्य यांच्या नावे असलेला मठ, पाण्याची टाकी, सामुदायिक स्वयंपाकघर, इ. इमारतीही आहेत.५०-मीटर (१६० फूट) याच्या बाहेर ७५० मीटर लांबीचा दोन्हीकडे दगडी चौथरे असलेला बाजार आहेत. याच्या दुसऱ्या टोकाला अखंड नंदी मंदिर आहे.

विरूपाक्ष मंदिर पूर्वाभिमुख असून, शिव आणि पंपा देवी मंदिरांची गर्भगृहे सूर्योदयाशी संरेखित केली आहेत; त्याच्या प्रवेशद्वाराशी एक मोठे गोपुरम आहे. हे गोपुरम पिरॅमिडच्या आकाराचा बुरुज असून यात मजले आहेत प्रत्येक मजल्यावर कामुक शिल्पांच्या कलाकृती आहेत.

गोपुरातून आत गेल्यानंतर एक आयताकृती प्रांगण लागते, तेथे एक दीपस्तंभ आणि नंदी आहेत. प्रांगणाच्या टोकाला १५१०मध्ये बांधलेले एक दुसरे लहान गोपुरम आहे. या गोपुरमच्या दक्षिणेला १००-स्तंभांचा मंडप आहे. या मंडपाच्या प्रत्येक खांबाच्या चारही बाजूंवर कोरीवकाम केलेले आहे. या मंडपाला जोडून एक सामुदायिक स्वयंपाकघर आहे. अशी रचना हंपीतील अनेक मंदिरांतून दिसते. स्वयंपाकघर आणि मंडपापर्यंत पाणी खडकात कोरलेल्या जलवाहिनीतून येते.

लहान गोपुरम नंतरच्या प्रांगणामधून पुढे गेल्यानंतर शिवमंदिराचा मुख्य मंडप लागतो. येथे मुख्य चौरसाकृती मंडप आणि कृष्णदेवरायाने बांधलेले दोन जोडलेले चौथरे आणि सोळा स्तंभ असलेला आयताकृती प्रांगण आहे. येथील मंडपाच्या छतावर शिव-पार्वती विवाहाचे चित्रीकरण आहे. छताच्या दुसऱ्या भागात वैष्णव परंपरेतील राम-सीतेच्या जीवनातील दृष्ये आहे.. तिसऱ्या भागात पार्वतीने प्रार्थना केल्यावर शंकरावर कामबाण सोडणाऱ्या कामदेवाचे चित्रण आहे तर चौथ्या विभागात विद्यारण्य यांची मिरवणूक जात असल्याचे दृश्य आहे.

जॉर्ज मिशेल आणि इथर विद्वानांच्या मते ही १९व्या शतकातील असून त्यांखाली असलेली चित्रांचा उगम अज्ञात आहे.

मंडपाच्या खांबांमध्ये घोडे, हत्ती, सिंह यांच्यासारखे पौराणिक प्राणी व त्यांच्यावर सवार योद्धे यांची शिल्पे आहेत.

विरूपाक्ष मंदिराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मुखलिंग आणि पितळाचा मुखवटा असलेले शिवलिंग आहेत.. मुख्य गर्भगृहाच्या उत्तरेला पार्वतीच्या पंपा आणि भुवनेश्वरी या दोन रूपांची लहान मंदिरे आहेत. यांतील भुवनेश्वरी मंदिर हे चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचे असून याच्या बांधणीत ग्रॅनाइटचा वापर केला आहे.

मंदिराच्या मुख्य प्रांगणाच्या उत्तरेस एक छोटे गोपुरम आहे. येथून नदीकडो आणि मन्मथ कुंडाकडे दगडी रस्ता जातो. मन्मथ कुंडाच्या पश्चिमेस शाक्त आणि वैष्णव परंपरेतील दुर्गा आणि विष्णूची मंदिरे आहेत. या परिसरातील काही मंदिरांना १९व्या शतकतील ब्रिटिश अधिकारी एफ.डब्ल्यू. रॉबिन्सन यांच्या आदेशाने पांढरा रंग देण्यात आला होता. हंपीच्या जीर्णोद्धाराच्या प्रयत्नाला आता पारंपारिक स्वरूप आले असून आजही येथील इमारतींना पांढराच रंग दिला जातो.

१५६५मध्ये हंपीचा नाश झाल्यावर सुद्धा विरूपाक्ष मंदिर हे हिंदूंचे तीर्थस्थान राहिले होते. आजही हे मंदिर मोठ्या संख्येने पर्यटकांना आणि यात्रेकरूंना येथे आकर्षित करते. वसंत ऋतूमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विरूपाक्ष आणि पंपा यांच्या विवाहाचा उत्सव आणि रथयात्रा असते.

कृष्ण मंदिर, बाजार, नरसिंह आणि शिवलिंग

हंपी 
कृष्ण मंदिराचे अवशेष

हेमकूट टेकडीच्या दुसऱ्या बाजूला, विरूपाक्ष मंदिराच्या दक्षिणेस सुमारे १ किमी अंतरावर बाळकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर १५१५मध्ये बांधले गेले होता. येथील शिलालेखांध्ये या भागाला कृष्णपुरा असे नाव दिलेले आहे. मुस्लिम टोळधाडीत उद्ध्वस्त झालेल्या या मंदिराच्या समोर लांबलचक बाजारपेठ आहे. रुंद रस्त्याच्या दुतर्फा दगडी चौथरे असून या रस्त्यावरून मालाची ने-आणकेली जात असे. हा रस्ता समारंभ आणि उत्सवांसाठी वापरला जात असे. या रस्त्याच्या मध्यात पुष्करणी (सार्वजनिक वापरासाठीची पायऱ्या असलेले पाण्याचे टाके) आहे. याच्या मध्यभागात एक कलाकुसर असलेला मंडप आहे आणि पुष्करणीजवळ सार्वजनिक सभागृह आहे.

शिवलिंग (डावीकडे) आणि उग्र योगा - नरसिंहाची अखंड दगडातून जागेवरच कोरलेली मूर्ती. नरसिंहाचे नुकसान झाले आहे, त्याच्या पायावर भाजलेल्या खुणा आहेत.

कृष्णमंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या प्रवेशद्वारावर तळाशी असलेल्या मत्स्यावतारापासून छतापर्यंत विष्णूच्या दशावतारांचे कोरीव काम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्ण आणि देवीची उद्ध्वस्त झालेले देव्हार आहेत. मंदिराच्या आवाराला दोन गोपुरे असून आत अनेकमजली मंडप आहे. यातील एक ५x५ फूटांचा खुला मंडप आणि ३x३ फूटांचा बंदिस् मंडप आहे. पश्चिमेकडील गोपुरा व्यूहरचनेत सैनिक असलेल्या चित्रमालिका आहेत. पूर्व गोपुरासमोरून हंपी-कमलापुरम असा आधुनिक रस्ता जातो.

कृष्ण मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दोन मंदिरे आहेत. एकाच प्रचंड आकाराचे अखंड शिवलिंग आहे. ३ मीटर उंचीचे हे शिवलिंग घनाकार खोलीत पाण्यात उभे आहे. त्याच्यावर त्रिनेत्र रेखाटलेले आहे. शिवमंदिराच्या दक्षिणेस नृसिंहाची बसल्याजागी पाषाणातून कोरलेली ६.७ मीटर उंचीची भव्य मूर्ती आहे. नृसिंहाशेजारी पूर्वी लक्ष्मीची मूर्ती होती परंतु तेथे आता जळिताची चिह्ने आङेत. या मंदिरांचा अंशतः जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे.

डावीकडे: अच्युतराय मंदिराचे अवशेष; उजवीकडे: मंदिराच्या अवशेषांसमोरील बाजारपेठ.

अच्युतराय मंदिर आणि बाजार संकुल

अच्युतराय मंदिर तथा तिरुवेंगलनाथ मंदिर विरूपाक्ष मंदिराच्या सुमारे १ किमी पूर्वेस आहे. हे मंदिर असलेला परिसर तुंगभद्रा नदीकाठी आहे. १५३४मधीय एका शिलालेखामध्ये या भागाचा उल्लेख अच्युतपुर असा आहे. हा परिसर हंपीतील मोठ्या संकुलांपैकी एक आहे.] विष्णूचे हे मंदिर उत्तराभिमुख आहे. या मंदिरात जाण्यासाठी एक पुष्करणी ओलांडून बाजारातून येथे वाट होती. मंदिराच्या बाह्य गोपुरातून आत गेल्यावर विष्णूमंदिराच्या समोर १०० स्तंभांचा एक सभामंडप आहे. या सभामंडपातील १००पैकी प्रत्येक खांबावर विष्णूचे अवतार, शंकर, सूर्य, दुर्गा यांच्या कोरीव मूर्त्या तसेच दैनंदिन जीवनातील दृष्ये, जसे प्रेमळ जोडपे, विदूषक, ऋषी, योगासने करणारी माणसे, विजयनगरची प्रतीके आणि इतर अनेक प्रकारची कोरीव नक्षी आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर वराह अवतार, तलवार, सूर्य, चंद्र, इ. विजयनगर साम्राज्याची प्रीके आहेत. यासमोरील रस्ता आता उद्ध्वस्त असला तरी त्याच्या मांडणीवरून हा रस्ता रथवाहतूकीचा प्रमुख रस्ता असल्याचे लक्षात येते.

विठ्ठल मंदिर आणि बाजार संकुल

हंपी 
विठ्ठल मंदिर गोपुर आणि बाजार.

विठ्ठल मंदिर आणि त्याच्याशी संलग्न बाजारपेठ संकुल तुंगभद्रा नदीच्या काठी विरूपाक्ष मंदिराच्या ईशान्येकडे सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर आहे. हंपीमधील मंदिरांपैकी येथील कला आधुनिक समजली जाते. या परिसराची बांधणी कोणी व कधी केली हे स्पष्ट नाही पंतु १६व्या शतकाच्या पूर्वार्धात हे बांधले गेल्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या देवरायाच्या काळात बहुधा याचे बांधकाम सुरू झाले आणि कृष्णदेवराय, अच्युतराय आणि बहुधा सदाशिवराय यांच्या कारकिर्दीत ते चालू राहिले असावे. १५६५मध्ये शहराच्या विनाशात या परिसराचाही नाश झाला.. शिलालेखांतील नावांवरून हा परिसर अनेक लोकांच्या साहाय्याने बांधला गेला असल्याचे कळते. या भागाील मुख्य मंदिर विठ्ठलाचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याचा आराखडा आयताकृती आहे आणि दोन बाजूंच्या गोपुरांसह प्रवेशाचे गोपुर देखील आहे. मुख्य मंदिराच्या पूर्वेस अनेक मंदिरे एका रांगेत आहे. ५००x३०० फूट आकाराचे हे मंदिर खांबांच्या तिहेरी रांगेने वेढलेले आहे. विठ्ठल मंदिराला सभामंडप, अर्धमंडप आणि गाभारा असे भाग आहेत. हे एकमजली मंदिर साधारण २५ फूट उंचीचे आहे.

हंपी 
विठ्ठल मंदिरात दगडी रथाच्या रूपात गरुड मंदिर.

विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात असलेले गरुड मंदिर हंपीमधील सर्वाधिक छायाचित्रित इमारत आहे. दगडातून कोरलेले हे मंदिर रथाच्या स्वरुपात असून याच्याभोवती मोठे प्रांगण आहे. या रथावरील एक बुरुज १९४० च्या दशकात काढला गेला. रथासमोरील प्रांगणात चार भागांचा मोठा सभामंडप आहे. यातील दोन भागांतून मंदिराच्या गाभाऱ्यात जाता येते. सभामंडपात वेगवेगळ्या व्यासाचे, आकाराचे, लांबीचे आणि पृष्ठभाग असलेले ५६ कोरीव दगडी तुळके आहेत. यांच्यावर आघात केल्यावर त्यातून वेगवेगळे स्वर उमटतात; हा मंडप संगीत आणि नृत्याच्या सार्वजनिक उत्सवांसाठी वापरला जात असे.

हा रथ उत्सवांदरम्यान मंदिराभोवती फिरवत जात असल्याची आख्यायिका आहे.

मंदिराच्या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मंडपातून एका बंदिस्त मार्गात जाता येते. हा प्रदक्षिणा मार्ग (पूर्वेकडून घड्याळाच्या दिशेने); गरुड मंदिर, कल्याण (लग्न) मंडप, १०० स्तंभांचा मंडप, अम्मा मंदिर आणि उत्सव मंडप यांतून जातो. १.३ हेक्टर (३.२ एकर) विस्ताराच्ा या भागाला भिंतीचे कुपण असून आग्नेय कोपऱ्यात छताची खिडकी असलेले स्वयंपाकघर आहे.

मंदिराच्या आवाराबाहेर, साधारण पूर्वेस १ किमी लांबीची बाजारपेठ आहे. उद्ध्वस्त झालेला हा रस्ता आणि उत्तरेला असलेली अजून एक बाजारपेठ यांशिवाय येथे एक दक्षिणाभिमुख देवस्थान आहे. हा रस्ता रामानुजाचार्यांच्या मंदिरासमोर थांबतो.

हेमकूट टेकडी

हंपी 
हेमकुट टेकडी मंदिर

हेूकुट टेकडी उत्तरेला विरूपाक्ष मंदिर परिसर आणि दक्षिणेला कृष्ण मंदिर यांच्यामध्ये आहे. येथील इमारती विजयनगरपूर्व आणि विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळातील मंदिरे आणि बांधकामांची अद्याप टिकून असलेली उदाहरणे आहेत. या परिसरात अनेक शिलालेख आढळतात. येथून हंपी खोरे दिसते.

टेकडीवर पाण्याची टाकी, प्रवेशद्वार आणि मंडपांसह तीसहून अधिक लहान-ते-मध्यम आकाराची मंदिरे आणि इमारती आहेत. ही १४व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बांधली गेली होती. येथील काही इमारती चिरे आणि मोठाले खडक रचून केलेली स्थाप्ये आङेत. आणि काहींमध्ये फमसाना शैली सारख्या विविध स्थापत्यशैली दिसून येतात. दोन विभागामध्ये असलेल्या या मंदिरांतून सहसा तिहेरी कमानी, चौकोनी गर्भगृहे आणि तिहेरी शिवलिंगे आहेत. या दोन्ही विभागांना स्वतःचा असा मंडप आहे. या मंडपांवर पिरॅमिड आकाराचे अकरा थरांची शिखरे अशून त्यांवर दख्खनी शैलीतील चौरस कलश आहेत.

येथे असलेल्या शिलालेखावरून कळते की कांपिली राजांनी हा परिसर १४व्या शतकाच्या सुरुवातीस बांधला होता. हेमकूट टेकडी वरील चालुक्य, राष्ट्रकूट, कांपिली, विजयनगर सारख्या अनेक स्थापत्यशैलीतील इमारती पाहता असे वाटते की वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांची उभारण्यासाठीची ही प्रयोगशाळा होती.

या टेकडीवर गणेशाच्या कडालेकालू गणेश आणि शशिवेकालू गणेश या दोन अखंड मूर्ती आहेत. यांपैकी कडालेकालू गणेश मातंगाजवळील टेकडीच्या पूर्वेला आहे. ही मूर्ती ४.५ मीटर (१५ फूट) पेक्षा जास्त उंचीची असून बसल्याजागी पाषाणातून कोरलेली आहे. इतर अखंड असली तरी गणेशाचा सुळा मोडलेला आहेत

शशिवेकालु गणेश, कडलेकालू गणेशाच्या नैऋत्येला कृष्ण मंदिराजवळ आहे. ही अखंड दगडात कोरलेली मूर्ती २.४ मीटर (७.९ फूट) इतकी उंच आहे. शशिवेकालू गणेशा आपल्या आई, पार्वतीच्या मांडीवर बसलेला आहे. पार्वतीचे दर्शन फक्त मागच्या बाजूने होते..

हजारा राम मंदिर

डावीकडे: हजारा राम मंदिर; उजवीकडे: आतील खांब

रामचंद्र मंदिर तथा हजारा राम मंदिर हंपीच्या राजवाडा पहिसराच्या पश्चिमेस आहे. हे राजघराण्याचे खाजगी मंदिर होते. याची रचना पहिल्या देवरायाने १५व्या शतकाच्या पूर्वार्धात केली होती. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दसऱ्याची मिरवणूक, होळीचा उत्सव आणि इतर समारंभांचे चित्रीकरण आहे. त्याच बरोबर हत्ती, घोडे, सैनिकांची चित्रे आहेत. त्यांच्यावरच्या बाजूस संगीतकार, नर्तक आणि जनता उत्साहात मिरवणूकीत सहभागी होताताना दिसते. या चित्रणातील दृष्यांचे पडसाद हंपीला भेट दिलेल्या पोर्तुगीज आणि फारसी लोकांच्या वर्णनातून दिसतात.

मंदिराच्या आतील भिंतींवर रामायणातील प्रसंगांची चित्रे आहेत. मंदिरात एक प्रवेश मंडप आणि यज्ञ समारंभासाठी प्रशस्त खोली आहे. खोलीच्या छताची रचना धुके आणि धूर व्यवस्थित बाहेर जाईल अशा रीतीने करण्यात आली आहे. मुख्य मंडपाच्या आत होयसाळ शैलीतील चार बारीक कोरीव काम असलेले खांब आहेत; या कोरीव कामांमध्ये वैष्णव धर्मातील राम, लक्ष्मण आणि सीता, शक्ती धर्मातील महिषासुरमर्दिनी म्हणून दुर्गा आणि शैव धर्मातील शिव-पार्वतीचे चित्रण समाविष्ट आहे. चौरसाकृती गर्भगृहातून प्रतिमा गायब आहेत. मंदिरामध्ये विष्णू अवतारांच्या दंतकथा दर्शविणारे एक छोटेसे मंदिर आहे. या परिसरातील बहुतेक इमारती उद्ध्वस्त झालेल्या असल्या तरीही आजही हजारो शिल्पकृती, उद्याने अद्यापही आहेत.

कोदंडराम मंदिर आणि नदीकाठ

डावीकडे: हिंदू उत्सवातील मिरवणूका दाखवणाऱ्या राम मंदिराच्या बाहेरील भिंती; उजवीकडे: मंदिराच्या आत जैन तीर्थंकर उठावचित्र.
हंपी 
हंपी येथील तुंगभद्रा नदीकाठच्या गडांवरील शिवलिंग आणि नंदी

कोदंडराम मंदिर परिसर तुंगभद्रा नदीजवळ आणि अच्युतराय मंदिराच्या उत्तरेस आहे. मंदिराचे द्वार चक्रतीर्थाकडे आहे. येथे तुंगभद्रा उत्तरेकडे वळते. येथे नदीघाट आणि अंघोळीसाठी मंडपाची सोय आहे. मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाखाली एक दीपस्तंभही आहे. तेथून कोटितीर्थापर्यंत विठ्ठल, हनुमान, शंकर आणि इतर देवतांची छोटी देवळेही आहेत. जवळच्या खडकांवर अनंतशयनी विष्णू, नृसिंह आणि प्रल्हादाच्या आख्यायिकांंची कोरीव शिल्पे आणि विष्णूपुराणातील चोवीस अवतार आहेत.

हंपी 
हंपी उपनगरातील पट्टाभिराम मंदिर

पट्टाभिराम मंदिर परिसर

पट्टाभिराम मंदिर परिसर मुख्य शहरापासून दक्षिणेस ५०० मीटर अंतरावर आहे. याला वरदेवी अम्मानपट्टण असेही म्हणतात. हा परिसर नृत्यगायनांच्या कार्यक्रमांसाठी वापरला जात असे. येथील मंदिर १६व्या शतकाच्या सुरुवाती बांधले गेले असावे. पूर्वाभिमुख मंदिरासमोरील प्रांगणात खांबांची दुहेरी रांग आहे आणि गाभाऱ्यासमोर ८x८ मीटर आकाराचा मंडप आहे, पूर्वी येथे १०० स्तंभांचा मंडप असल्याच्या खूणा आहेत.

महानवमी व्यासपीठ, सार्वजनिक चौक

हंपी 
महानवमी व्यासपीठ स्मारक

महानवमी व्यासपीठ किंवा "दसरा दिब्बा" तथा "महानवमी दिब्बा" हे राजवाड्याच्या आतील ७.५-हेक्टर (१९-एकर) विस्ताराचा परिसर आहे. तीन पायऱ्या चढून गेल्यावर या मोठा चौकोनी चौथऱ्यावर लाकडी मंडप आहे. हा नंतर बांधलेला आहे.

या चौथऱ्याच्या खालच्या दोन ग्रॅनाइटच्या स्तरांवर हत्ती, घोडे, उंट यांचे कोरीव काम आहे. दक्षिणेकडील कोरीवकामात दांडिया नृत्य करणारे नर्तक आणि संगीतकार दिसतात. तिसऱ्या स्तरावर युद्धाला निघालेले सैन्य आणि वसंतोत्सवाची दृष्ये आहेत. चौथऱ्याच्या दक्षिणेला ग्रॅनाइटमध्ये खणलेली एक जलवाहिनी आहे.

पाणी पुरवठा

हंपी 
हंपीच्या अवशेषांमधील एक पाण्याची टाकी

राजवाड्याच्या आग्नेयेस असलेल्या नहाणीघरात मंडप, पाण्याचे कुंड आणि त्यात पाण्याची ये-जा करण्यासाठीच्या वाहिन्या दिसून येतात. ही इमारत बरीचशी बंदिस्त आहे. येथे पाणी आणण्यासाठीची जलवाहिनी आता भग्नावस्थेत आहे. ही इमारत भारतीय इस्लामिक शैलीत बांधलेली आहे.

हंपीमधील पाणी पुरवठा प्रणालीची काही उदाहरणे विरूपाक्ष मंदिराजवळील मन्मथ कुंडच्या आसपास दिसते. विजयनगर साम्राज्याच्या आधीपासून असलेलले हे कुंड अंदाजे ९व्या शतकात बांधले गेले असल्याचा अंदाजी आहे.

हंपी 
पायऱ्या असलेली चौरसाकृती पाण्याची टाकी.

हंपी शहरातून पाणी साठवण्यासाठी पुष्करणी आणि त्यांत पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिन्या अद्यापही आहेत. वापरलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या वेगळ्या वाहिन्याही शहरभर आहेत. टाक्या ही एक सार्वजनिक सुविधा होती; काहींचा वापर कदाचित शाही समारंभासाठी केला जात असे.

१९९० च्या सुमारास झालेल्या उत्खननात शहरात २३ विहिरी आणि पुष्करणीआढळून आल्या. त्यापैकी १३ मुख्य शहराच्या तटबंदीबाहेर तर १० आत आहेत. या पुष्करणींपैकी १२ रस्त्याच्या कडेला, ८ मंदिरांजवळ, १० निवासी भागात आणि २ बाजारपेठांमध्ये होत्या.

कारंजे आणि सामुदायिक स्वयंपाकघर

हंपीमधील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये सामुदायिक स्वयंपाकघर आणि जेवणाचे मंडप आहेत. हे मोठमोठाले मंडब १०० किंवा त्याहून अधिक खांब असलेले आहेत. यावरून त्यांच्या क्षमतेची कल्पना येते. शहरात एक मुख्य सार्वजनिक भोजनशाला देखील होती. येथे जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंच्या खडकात असंख्य थाळ्या कोरलेल्या आहेत. यात पाने ठेवून जेवण वाढले जात. हे राजवाड्याच्या दक्षिणेला एका अष्टकोनी कारंज्याजवळ आढळते; याला उताडा कलुवे किंवा "खाण्याशी जोडलेला कालवा" असे म्हणत.

गजशाळा

राजवाड्याच्या पूर्वेला गजशाळा आहे. यात अकरा हत्ती राहण्याची जागा असून यांची दारे कमानदार आहेत आणि वर चुण्या असलेले घुमट आहेत. गजशाळेच्या मध्यातून छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. ही गजशाळा शहराभोवी असलेल्या तटबंदीला लागून तटाच्या आत आहे.

कमल महाल (डावीकडे) आणि गजशाळा: विविध प्रकारच्या शैलींचे संयोजन असलेली स्मारके.

तटबंदीच्या आत चित्रांगिणी महाल तथा कमल महाल आहे. या महालाच्या मध्यभागात दुमजली मंडप आहे. हंपीच्या इतर राजमहालांप्रमाणे या इमारतीवर कोणताही शिलालेख किंवा तत्सम पुरवे नाहीत. यामुळे याच्या बांधणीचा नेमका काळ कळत नाही.

जैन मंदिरे

हंपीमध्ये हिंदू मंदिरांसोबत काही जैन मंदिरेही आहेत. यांत हेमकूट जैन मंदिरे, रत्नांत्रयकुट, पार्श्वनाथ चरण आणि गणगित्ती जैन मंदिरे यांचा समावेश होतो. १४व्या शतकात बांधलेल्या या मंदिरांमधून बहुतेक मूर्ती आता गायब आहेत.

गणगित्ती मंदिर परिसर

हंपी 
गणगित्ती जैन मंदिर

गणगित्ती जैन मंदिर हंपीच्या शहरी भागाच्या आग्नेयेला भीमाच्या दरवाजाजवळ आहे. त्याच्या समोर एक दीपस्तंभ आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे असून मंदिरातील शिलालेखानुसार हे हिंदू राजा दुसऱ्या हरिहरच्या शासनकाळात, इ.स. १३८५ मध्ये बांधले गेले होते. हे तीर्थंकर कुंथुनाथचे मंदिर होते परंतु तेथील मूर्ती गायब आहे.

इतर जैन मंदिरे

अजून एक जैन मंदिरांचा समूह गजशाळेच्या पूर्वेला सुमारे १५० मी अंतरावर आहे. पार्श्वनाथाचे उत्तराभिमुख मंदिर दुसऱ्या देवरायाने बांधले होते. मंदिरातील एका शिलालेखानुसार ते इ.स. १४२६ मधील आहे. मंदिरासमोर एक शिव आणि दुसरा महावीरांना समर्पित अशी दोन उद्ध्वस्त मंदिरेही आहेत. हिंदू मंदिरांमधील कोरीवकांमध्येही जैन तीर्थंकर दिसतात.

मुस्लिम स्मारके

हंपी 
हंपी येथील अहमद खान कबर

हंपीमध्ये मुस्लिम परिसर आहे. यात काही थडगी, दोन मशिदी आणि एक दफनभूमी आहेत. या प्रदेशाचा बराचसा भाग गाळाने भरलेला आहे आणि मातीत दडलेली निर्मनुष्य मंदिरे, रस्ते, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वार आणि निवासी घरे येथे आढळतात.

अहमद खान मशीद आणि कबर

हंपीतून जाणाऱ्या कमलापुरा-अनेगोंदी रस्त्यावर शहराच्या आग्नेयेस मुस्लिम इमारतींचा परिसर आहे. दुसऱ्या देवरायाच्या सैन्यातील मुस्लिम सरदार अहमद खान याने इस १४३९ मध्ये बांधलेल्या या इमारतींमध्ये एक मशीद, एक अष्टकोनी विही आणि एक थडगे यांचा समावेश आहे. मशीदीला नेहमीप्रमाणे घुमट नसून त्याऐवजी खांब असलेला मंडप आहे. थडग्याला मात्र घुमट आणि कमानी आहेत. नंतरच्या काळात येथे इतर इमारती आणि कब्रस्तान जोडण्या आले.

परदेशी प्रवाशांच्या आठवणी आणि नोंदी

हंपीचे अवशेष, १९वे शतक
कृष्ण मंदिर १८६८ मध्ये
राम मंदिर १८६८ मध्ये
विठ्ठल मंदिर १८८० मध्ये
किंग्स बॅलन्स १८५८ मध्ये

१४२० च्या सुमारास हंपीला भेट देणारा इटालियन व्यापारी आणि प्रवासी निकोलो डी' कॉन्टी यांच्या आठवणींमध्ये, शहराचा अंदाजे परिघ ६० मैल (९७ किमी) होता आणि त्याच्या तटबंदीमध्ये शेती आणि वसाहती असल्याची नोंदआहे. १४४२ मध्ये पर्शियाच्या अब्दुल रझाकने हंपीचे वर्णन सात तटबंद्या असलेले शहर असे केले आहे. सर्वात बाहेरील दोन तटात शेती आणि नागरिक वस्ती तर तिसऱ्या ते सातव्या तटातील जागा दुकाने आणि बाजार यांनी खूप गजबजलेले असल्याची नोंदही आहे.

१५२० मध्ये पोर्तुगीज गोव्याच्या व्यापार दलाने हंपीला भेट दिली असताना त्यातील एक प्रतिनिधी दॉमिंगो पेसने आपल्या क्रॉनिका दोस रैस बिस्नागा या प्रवासवर्णनात विजयनगर हे "रोमसारखे मोठे आणि दिसायला अतिशय सुंदर... जगातील सर्वोत्तम शहर" असल्याचे लिहिलेले आहेत. पेसच्या म्हणण्यानुसार, "त्याच्या आत अनेक चर आहेत, घरांच्या बागांमध्ये, पाण्याच्या अनेक नाल्या आहेत ज्या मधून वाहतात आणि काही ठिकाणी तलाव आहेत ...".

१५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याची अधोगती झाल्यानंतर काही दशकांनंतर इटालियन व्यापारी आणि प्रवासी सेझारे फेदेरिकी याने भेट फेदेरिकीने केलेले विजयनगरचे वर्णन हे अगदी वेगळे आहे. फेदेरिकीने लिहिले आहे की, "बेझेनेगर (हंपी-विजयनगर) शहर पूर्णपणे नष्ट झालेले नाही, काही घरे उभी आहेत, परंतु रिकामी आहेत आणि त्यात वाघिणी आणि इतर जंगली श्वापदांशिवाय काहीही राहत नाही".

इतिहासकार विल ड्युरांटने आपल्या अवर ओरिएंटल हेरिटेज: द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या पुस्तकात विजयनगरची कथा एक विजय आणि विनाशाची एक निराशाजनक कथा असल्याचे लिहिलेले आहे. त्यांनी लिहिली आहे की संस्कृती ही अतिनाशवंत गोष्ट आहे. यातील क्लिष्ट व्यवस्था, स्वातंत्र्य, कला आणि शांतता ही कोणत्याही क्षणी युद्ध आणि क्रूर हिंसाचाराने उलथून जाते.

हे देखील पहा

ग्रंथसूची

चित्रदालन

नोंदी

संदर्भ

बाह्य दुवे

हंपी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

हंपी  विकिव्हॉयेज वरील Hampi पर्यटन गाईड (इंग्रजी)

Tags:

हंपी स्थानहंपी इतिहासहंपी वर्णनहंपी परदेशी प्रवाशांच्या आठवणी आणि नोंदीहंपी हे देखील पहाहंपी ग्रंथसूचीहंपी चित्रदालनहंपी नोंदीहंपी संदर्भहंपी बाह्य दुवेहंपीकर्नाटकभारतातील जागतिक वारसा स्थानेयुनेस्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुलढाणा लोकसभा मतदारसंघशिवछत्रपती पुरस्कारए.पी.जे. अब्दुल कलामदौलताबाददेवेंद्र फडणवीसआयुर्वेदकुलदैवतकाळभैरवअपारंपरिक ऊर्जास्रोतरावेर लोकसभा मतदारसंघरोहित शर्मायूट्यूबवृद्धावस्थाकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघकबड्डीपारिजातकबच्चू कडूराज्य निवडणूक आयोगसमासराज ठाकरेस्वामी समर्थभारतीय चलचित्रपटअंकिती बोसअध्यक्षगणपती स्तोत्रेनामदेवकृष्णसप्तशृंगी देवीदालचिनीअर्थशास्त्रॲडॉल्फ हिटलरउद्योजकसमर्थ रामदास स्वामीसोलापूरमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनप्रदूषणअनिल देशमुखफकिरानेपोलियन बोनापार्टखडकवासला विधानसभा मतदारसंघवाघग्रंथालयज्ञानेश्वरन्यूझ१८ लोकमतइतिहासकोकणनरसोबाची वाडीतुणतुणेमहाराष्ट्रातील लोककलातुळजापूरराज्यपालखिलाफत आंदोलनगाडगे महाराजइस्लामजालना लोकसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळनांदेड जिल्हानफागहूवसंतराव दादा पाटीलजास्वंदकादंबरीज्वारीकांजिण्यापंढरपूरमहाराष्ट्राचे राज्यपालदक्षिण दिशालातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीतुकडोजी महाराजवंचित बहुजन आघाडीसाम्यवादहरितक्रांतीछत्रपती संभाजीनगरपुरंदर किल्लासूर्यमालाचैत्र पौर्णिमा🡆 More