समास: मराठी व्याकरण प्रकार

मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, ह्याला समास असे म्हणतात.

उदा. 'पोळीसाठी पाट' या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द वापरला जातो. मराठी भाषेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ व्यक्त होतात.

उदा. वडापाव – वडा घालून तयार केलेला पाव.
पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट
कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे.
पंचवटी – पाच वडांचा समूह

समासांचे मुख्य प्रकार

समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात. या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात.

क्र. समासाचे नाव प्रधान पद उदाहरण
१. अव्ययीभाव पहिले आजन्म, पदोपदी
२. तत्पुरुष दुसरे राजवाडा, गायरान
३. द्वंद्व दोन्ही पितापुत्र, बरेवाईट
४. बहुव्रिही अन्य चंद्रमौली, गजमुख

१. अव्ययीभाव समास

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला भाषेतील खालील उदाहरणे पाहावयास मिळतात.

अ) मराठी भाषेतील शब्द

गावोगावी - प्रत्येक गावी
गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
दारोदारी – प्रत्येक दारी
घरोघरी – प्रत्येक घरी
मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

ब) संस्कृत भाषेतील शब्द

प्रति (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
आ (पर्यंत) – आमरण
आ (पासून) – आजन्म, आजीवन
यथा (प्रमाणे) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपसर्गांना अव्यय मानले जाते. वरील उदाहरणांमध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपसर्गांना सामासिक शब्दांत अधिक महत्त्व आहे.

क) अरबी व फारसी भाषेतील शब्द

दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.
गैर (चुकीचा) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
हर (प्रत्येक) – हररोज, हरकाम्या
बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक
वरील उदाहरणात मराठी भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.

२. तत्पुरुष समास

ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दुसरा शब्द प्रधान(महत्त्वाचा) असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा. महामानव – महान असलेला मानव
राजपुत्र – राजाचा पुत्र
तोंडपाठ – तोंडाने पाठ
गायरान – गाईसाठी रान
वनभोजन – वनातील भोजन

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने इत्यादी विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे ७ उपप्रकार पडतात.

अ) विभक्ती तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात. उदा. व्दितीया विभक्ती : कृष्णाश्रित = कृष्णाला आश्रित, देशगत, प्रयत्नसाध्य तृतीया विभक्ती : तोंडपाठ = तोंडाने पाठ, गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, दयार्द्र, ईश्वरनिर्मित चतुर्थी विभक्ती : क्रीडांगण = क्रीडेसाठी अंगण, गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाइलवेडा पंचमी विभक्ती : ऋणमुक्त = ऋणातून मुक्त, सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभष्ट, चोरभय, जन्मखोड षष्ठी विभक्ती : राजपुत्र = राजाचा पुत्र, देवपूजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आंबराई सप्तमी विभक्ती : घरजावई = घरातील जावई, स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा

ब) अलुक् तत्पुरुष

ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक् तत्पुरुष समास म्हणतात. अलुक् म्हणजे लोप न पावणारा (लुक्= लोप होणे). ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक् तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. तोंडी लावणे
पाठी घालणे
अग्रेसर

क) उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधित/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. उदा.

ग्रंथकार – ग्रंथ करणारा
शेतकरी – शेती करणारा
लाचखाऊ – लाच खाणारा
सुखद – सुख देणारा
जलद – जल देणारा

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत. नंतर दुसऱ्या पदात त्यांचे रूपांतर धातुसाधितांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. इतर उदाहरणे :
लाकूडतोड्या, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

ड) नञ् तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नञ् तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नञ् तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, नि, इ.) उदा.

अयोग्य – योग्य नसलेला
अज्ञान – ज्ञान नसलेला
अहिंसा – हिंसा नसलेला
निरोगी – रोग नसलेला
निर्दोष – दोषी नसलेला

इ) कर्मधारय तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात. उदा.

नीलकमल – नील असे कमल
रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
महादेव – महान असा देव
पीतांबर – पीत असे अंबर ज्याचे (पीत=पिवळे, अंबर=वस्त्र)
मेघशाम – मेघासारखा काळा
चरणकमळ – चरण हेच कमळ
खडीसाखर – खड्यासारखी साखर
तपोबळ – तप हेच बळ

कर्मधारय समासाचे पुढील ७ उपप्रकार पडतात :

  • अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात. उदा. महादेव – महान असा देव
लघुपट – लहान असा पट
रक्तचंदन – रक्तासारखे चंदन

  • आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारेय असे म्हणतात. उदा. पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
मुखकमल – मुख हेच कमल
वेशांतर – अन्य असा वेश
भाषांतर – अन्य अशी भाषा

  • इ) विशेषण उभयपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासाला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात. उदा. लालभडक – लाल भडक असा
श्यामसुंदर – श्याम सुंदर असा
काळाभोर – काळा भोर असा
पांढराशुभ्र – पांढरा शुभ्र असा
हिरवागार – हिरवागार असा
कृष्णधवल – कृष्ण धवल असा

  • ई) उपमान पूर्वपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्त्व दिलेले असते. उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. उदा. वज्रदेह – वज्रासारखे देह
चंद्रमुख – चंद्रासारखे मुख
राधेश्याम – राधेसारखा शाम
कमलनयन– कमळासारखे नयन

  • उ) उपमान उत्तरपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्त्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात. उदा. मुखचंद्र – चंद्रासारखे मुख
नरसिंह – सिंहासारखा नर
चरणकमल – कमलासारखे चरण
हृदयसागर – सागरासारखे हृदय

  • ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असून त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात. उदा. सुयोग – सु (चांगला) असा योग
सुपुत्र – सु (चांगला) असा पुत्र
सुगंध – सु (चांगला) असा गंध
सुनयन – सु (चांगला) असा डोळे
कुयोग – कु (वाईट) असा योग
कुपुत्र – कु (वाईट) असा पुत्र

  • ए) रूपक कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समासाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात. उदा. विद्याधन – विद्या हेच धन
यशोधन – यश हेच धन
तपोबल – तप हेच बल
काव्यामृत – काव्य हेच अमृत
ज्ञानामृत – ज्ञान हेच अमृत

फ) व्दिगू समास

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. उदा. नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
पंचवटी – पाच वडांचा समूह
चातुर्मास – चार मासांचा समूह
त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
सप्ताह – सात दिवसांचा समूह
चौघडी – चार घड्यांचा समूह

ग) मध्यमपदलोपी समास

ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात. उदा. साखरभात – साखर घालून केलेला भात
पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी
कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे
घोडेस्वार – घोड्यावर असलेला स्वार
बालमित्र – बालपणापासूनचा मित्र
चुलत सासरा – नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा
लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र

३. व्दंव्द समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
विटीदांडू – विटी आणि दांडू
पापपुण्य – पाप आणि पुण्य
बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
आईवडील – आई आणि वडील
स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
ने-आण – ने आणि आण
दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर

व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.

अ) इतरेतर व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. आईबाप – आई आणि बाप
हरिहर – हरी आणि हर
स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
पशुपक्षी – पशू आणि पक्षी
बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
डोंगरदऱ्यात – डोंगर आणि दऱ्यात
ब्रह्माविष्णूमहेश - ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश

ब) वैकल्पिक व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यासवैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. खरेखोटे – खरे किंवा खोटे
तीनचार – तीन किंवा चार
बरेवाईट – बरे किंवा वाईट
पासनापास – पास अथवा नापास
मागेपुढे – मागे अथवा पुढे
चुकभूल – चूक अथवा भूल
न्यायान्याय – न्याय अथवा अन्याय
पापपुण्य – पाप किंवा पुण्य
सत्यासत्य – सत्य किंवा असत्य

क) समाहार व्दंव्द समास

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. मीठभाकर – मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
चहापाणी – चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू
अंथरुणपांघरुण – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे
शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता
केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ
नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर
जीवजंतू – जीव, जंतू व इतर कीटक

४. बहुव्रीही समास :

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. उदा.

नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
दशमुख – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)

बहुव्रीही समासाचे खालील ४ उपप्रक्रार पडतात :

अ) विभक्ती बहुव्रीही समास

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. उदा.

प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती
गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
पूर्णजल – पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती

ब) नञ् बहुव्रीही समास

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ् बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन,नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदा.

अनंत – नाही अंत ज्याला तो
निर्धन – नाही धन ज्याकडे तो
नीरस – नाही रस ज्यात ते
अनिकेत – नाही निकेत (निकेतन =घर) ज्याला तो
अव्यय – नाही व्यय ज्याला तो
निरोगी – नाही रोग ज्याला तो
अनाथ – ज्याला नाथ नाही असा तो
अनियमित – नियमित नाही असे ते
अकर्मक – नाही कर्म ज्याला ते
अखंड – नाही खंड ज्या ते

क) सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. उदा.

सहपरिवार – परिवारासहित असा जो
सबल – बलासहित आहे असा जो
सवर्ण – वर्णासहित असा तो
सफल – फलाने सहित असे तो
सानंद – आनंदाने सहित असा जो

ड) प्रादिबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. उदा.

सुमंगल – पवित्र आहे असे ते
सुनयना – सु-नयन असलेली स्त्री
दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती
प्रबळ -अधिक बलवान असा तो
विख्यात – विशेष ख्याती असलेला
प्रज्ञावंत – बुद्धी असलेला

बहुव्रीही संयुग

शब्दांच्या ज्या समासीय संयुगांमध्ये रचलेल्या शब्दाच्या कोणत्याही पदाला प्राधान्य नसते, त्यांना बहुव्रीही संयुग म्हणतात. सामासिक शब्द दोन्ही संज्ञा (पूर्ववर्ती आणि उत्तरपद) तृतीय व्यक्ती, वस्तू किंवा विषयाचा संदर्भ देतात.

दोन्ही पदांव्यतिरिक्त अन्य शब्दाकडे निर्देश -
उदा. नीलकंठ

समास आणि विग्रह

    शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
    हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह' असे म्हणतात.

समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी

  1. एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात.
  2. समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करतात. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास
  3. मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. उदा. तोंड+ओळख=तोंडोळख ही चुकीची संधी आहे.
  4. भिन्न भाषांतील शब्दांचा समास करणे टाळतात. हेडशिक्षक(हेडमास्तर ठीक), डाकगृह(डाकघर ठीक आहे), गृहजावई (घरजावई बरोबर आहे).

संदर्भ

मो. रा. वाळंबे, सुगम मराठी व्याकरण व लेखन<\ref>

Tags:

समास ांचे मुख्य प्रकारसमास १. अव्ययीभाव समास २. तत्पुरुष समास ३. व्दंव्द  :समास ४. बहुव्रीही  :समास आणि विग्रहसमास विषयक काही महत्त्वाच्या गोष्टीसमास संदर्भसमासपोळपाटमराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वररतन टाटातिरुपती बालाजीसात बाराचा उताराहापूस आंबागुरवप्रकाश आंबेडकरजीवनसत्त्वफलटण तालुकासंशोधनठाणे लोकसभा मतदारसंघतानाजी मालुसरेइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसविता आंबेडकरवर्धमान महावीरभारत सरकार कायदा १९३५पुणे जिल्हावाघजेजुरीरोजगार हमी योजनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजिंतूर विधानसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढागुरू ग्रहगुढीपाडवानृत्यअकोला लोकसभा मतदारसंघनामदेवसमीक्षावेरूळ लेणीगौतम बुद्धशिवनेरीकेरळसातारा जिल्हागूगलभारताचा भूगोलहिरडातरसग्रामपंचायतकर्ण (महाभारत)१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजहांगीरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशेतीरामपुरस्कारप्रेरणाकोयना धरणउद्धव ठाकरेतेजस ठाकरेक्लिओपात्रापन्हाळासेंद्रिय शेतीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेयोनीआगाखान पॅलेसताम्हणदहशतवादमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकौरवडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनचोखामेळास्वादुपिंडछत्रपती संभाजीनगरत्र्यंबकेश्वरभास्कराचार्य द्वितीयकृष्णशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसिंहगडजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेधर्मो रक्षति रक्षितःयेसूबाई भोसलेवर्धा लोकसभा मतदारसंघसांगोला विधानसभा मतदारसंघअतिसारशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकबाळूमामाच्या नावानं चांगभलं🡆 More