लावणी: महाराष्ट्रातील कला प्रकार

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे.

लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते.भक्ती रसयुक्त लावणी मागे पडली .'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम.

लावणी: अभिजन वर्गात प्रसार, उत्पत्ती, लावणीचे प्रकार
लावणी कलावंतिणी

लावणी ही भारताच्या महाराष्ट्र प्रांतातली लोकप्रिय संगीताची एक शैली आहे. महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी होय. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित शृंगार श्रेणीतील लावण्या या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख लोकनाट्य फडांनी सादर करून लोकप्रियता मिळवली.  लावणी ही पारंपारिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे. लावणीमध्ये ढोलकी व तुणतुणे या वाद्याचा साथीने सादर केली जाते. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठेच योगदान आहे.  महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशात लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया या नऊवारी साड्या परिधान करून लावणी म्हणतात. ही गाणी खटकेबाज ,प्रासयुक्त ,गेय असतात.तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात लावणी अस्तित्वात असली तरी पेशवाईत तिला वैभव प्राप्त झाले.लावणीला अलिकडे चांगली प्रतिष्ठा मिळाली आहे.तिचे स्वरुपही बदलले आहे. भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत. लावणी हा नृत्यप्रकार मुख्यतः महाराष्ट्र या राज्यात बघायला मिळतो.

अभिजन वर्गात प्रसार

सुरेखा पुणेकर यांनी सुरू केलेल्या 'नटरंगी नार' या बैठकीच्या लावणी प्रयोगांनंतर खरेतर लावणीला महिला वर्गाचे आणि अभिजन वर्गाचे एक कलाप्रकार म्हणुन पुन्हा समर्थन मिळाले.पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. 'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला, हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान्‌पिढ्या गायली जात आहे. आधुनिक चित्रपटात लावणी हा कलाप्रकार मनोरंजनासाठी समाविष्ट केला गेला आहे.लावणीच्या पारंपरिक नृत्याला आधुनिक नृत्याची जोडही देण्यात आली आहे असे दिसते.

उत्पत्ती

'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यांत लावणीचा समावेश होता. महाराष्टातील संतांचे संस्कार हे तंतांवर होते. बाराव्या, तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतिपर्वात अनेक संत उदयाला आले ते भिन्न जातीपातीचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, तुलसीदास, महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकाराम,रामदास,एकनाथ, गोरोबा, सावता, चोखा, कान्होपात्रा, नरहरी अशी अनेक संत मंडळी विविध सामाजिक स्तरातील होती. संतांचा हा कार्यकाळ थेट १७ व्या शतकापर्यंतचा मानला जातो.

त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यांत प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहिरांनी अनेक गण, लावण्या रचल्या. त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, कवी बशीर मोमीन (कवठेकर), भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी आदी कलावंतांनी गण, गौळणी, लावण्या, कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य पुरवले. ४००० हून अधिक लावण्या, गण, गवळण, पोवाडे आणि लोकगीतांच्या लेखनातून त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. महाराष्ट्र शासनाने बशीर मोमीन कवठेकर यांना सन २०१८ च्या "तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित केले आहे.

'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे. कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते. संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदयकाळ मानला जातो.

शृंगारिक लावणीचे एक उदाहरण म्हणून, लावणी कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांची, १९९० च्या दशकातील, सुरेखा पुणेकर यांनी गायलेली एक लोकप्रिय लावणी खाली उद्धृत केली आहे.

शृंगार करूनी सेज सजविली l रंग महाली चला l
सजना पुढ्यात घ्याना मला llधृll
हि ज्वानी माझी ऐन भराला आली l शरीराचा बदलला रंग, गालावर लाली ll
मदनाची ही कळी उमलली निसर्गाची त्या कला ll१ll सजना.....

लावणीचे प्रकार

लावणी: अभिजन वर्गात प्रसार, उत्पत्ती, लावणीचे प्रकार 
लावणी कलाकार सीमा पोटे

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत.

  • नृत्यप्रधान लावणी
  • गानप्रधान लावणी (बैठकीची लावणी)
  • अदाकारीप्रधान लावणी

प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छक्कड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणा-या सुलोचना चव्हाण याना आपल्या सांगीतिक योगदानासाठी पद्मश्री पुस्र्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कांताबाई सातारकर यांनी तमाशा सादरीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिकाही रंगमंचावर सादर केल्या आहेत.

अदाकारीयुक्त प्रसिद्ध सादरीकरण

लावणी: अभिजन वर्गात प्रसार, उत्पत्ती, लावणीचे प्रकार 
लावणी नृत्य सादर करीत असताना महिला कलाकार
  • मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत, तेव्हा त्या घाबरलेल्या बालिका वधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे सांगितले असे त्यांचे वैशिष्ट्य सांगितले जाते.
  • यमुनाबाई वाईकरांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांच्या सोबत लावणीची अदाकारी केली होती. 'तुम्ही माझे सावकार' ही विलंबित लयीतील लावणी त्या अदाकारीसह सादर करीत असत.
  • 'पंचकल्याणी घोडा अबलख' ही नृत्यप्रधान लावणी अथवा 'पंचबाई मुसाफिर अलबेला' ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती. घुंगरांच्या बोलांचा आवाज, घोड्याच्या टापांसारखा काढण्याचे कसब या लावणी सम्राज्ञींनी आत्मसात केले होते. नृत्य, अदाकारी आणि गायन असा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या लावण्या, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, सुरेखा पुणेकर सादर करीत असत.
  • 'पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन' ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली आहे.

अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवातून तसेच शासनाच्या लावणी महोत्सवातून अलीकडच्या काळात ज्या लावणी नर्तकी प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यात राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर आदींचा उल्लेख करावा लागेल.सुरेखा पुणेकर यांनीही लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे असे दिसते.

भक्तिप्रधान लावणी

लावणी ही जसा शृंगार रसाचा परिपोष करते तसेच ती भक्तीरस ही दाखविते. चला जेजुरीला जाऊ या सारखी लावणी ही भक्तीरस प्रधान आहे.

लावणीचा एक नमुना

तमाशा फडामधे सादर करण्यात आलेली, श्री बशीर मोमीन (कवठेकर) लिखित, एक लोकप्रिय लावणी खालील प्रमाणे आहे:

मध्यानी रात्र झाली, आवचित जागआली l
सहीना विरह मजला, मी झाले अर्ध मेली ll
सांगू कशी मी तुजला, वैरीण रात्र गेली llधृ ll
इश्काची इंगळी डसली, त्यानेच गोष्ट फसली l
झाला उरात भडका, येईना झोप कसली ll
सहीना यातना त्या- मरणाचे घाव झेली ll१ ll

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

लावणी अभिजन वर्गात प्रसारलावणी उत्पत्तीलावणी चे प्रकारलावणी अदाकारीयुक्त प्रसिद्ध सादरीकरणलावणी भक्तिप्रधान लावणी चा एक नमुनालावणी संदर्भलावणी बाह्य दुवेलावणीतमाशामहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राम सातपुतेयूट्यूबडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारजेजुरीप्रेमानंद महाराजपश्चिम दिशाजपानपानिपतची दुसरी लढाईअजिंठा लेणीमांगराम गणेश गडकरीनरसोबाची वाडीस्वरछगन भुजबळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९विठ्ठलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनातीअकोला लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरीजवाहरलाल नेहरूस्वामी समर्थमुंबईयशवंत आंबेडकरबहिणाबाई पाठक (संत)गणपतीसिंधुताई सपकाळसंत जनाबाईभाषानाटकसंजय हरीभाऊ जाधवभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरशीत युद्धगावकरवंदमराठा आरक्षणमराठवाडालीळाचरित्रइतिहासाच्या अभ्यासाची साधनेप्राजक्ता माळीनियतकालिकआचारसंहिताबावीस प्रतिज्ञालोकमान्य टिळकमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीघनकचरामाळीराशीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारऋग्वेदभारतातील समाजसुधारकप्रदूषणद्रौपदी मुर्मूदलित एकांकिकाविवाहपुणे करारसोनिया गांधीएकनाथशनि (ज्योतिष)महाराष्ट्र विधानसभासंयुक्त राष्ट्रेसदा सर्वदा योग तुझा घडावापुणे लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाअमरावतीवेदकर्ण (महाभारत)परभणी विधानसभा मतदारसंघगुणसूत्रब्रिक्सअहमदनगर लोकसभा मतदारसंघसांगली लोकसभा मतदारसंघक्लिओपात्रादुसरे महायुद्धएकांकिका🡆 More