संत जनाबाई

संत जनाबाई (अंदाजे १२५८ - १३५०) या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवयित्री होत्या.

त्यांचा जन्म १३व्या शतकाच्या सातव्या किंवा आठव्या दशकात झाला होता.

संत जनाबाई
जन्म अंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यू अंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
वडील दमा
आई करुंड

महाराष्ट्रातील गंगाखेड येथील दमा आणि करुंड यांच्या पोटी जनाबाईंचा जन्म झाला. जातिव्यवस्थेखाली हे जोडपे मातंग समाजाचे होते. आई वारल्यानंतर त्यांचे वडील जनाबाईंना पंढरपूरला घेऊन गेले. लहानपणापासून जनाबाईंनी पंढरपूर येथे राहणाऱ्या दामाशेती (संत नामदेव यांचे वडील) यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम केले. जनाबाई बहुधा नामदेवांपेक्षा थोड्या मोठ्या होत्या आणि अनेक वर्षे त्यांचे पालन पोषण करत होत्या.

जनाबाईंचे मालक दामशेती आणि त्यांची पत्नी गोनाई हे अतिशय धार्मिक होते. सभोवतालच्या धार्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे आणि जन्मजात प्रवृत्तीमुळे जनाबाई नेहमीच विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी अभंग प्रकारातील अनेक उच्च दर्जाचे धार्मिक श्लोक रचले. नामदेवांच्या रचनांसह त्यांच्या काही रचना जतन करण्यात आल्या होत्या. सुमारे ३०० अभंगांचे लेखन परंपरेने जनाबाईंनी केल्याचे सांगितले जाते.

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे.

जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.

बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे पंधरा माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

विठ्ठल-भक्ती

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

अभंग-रचना

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.

‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात.

अभंगांचे वर्गीकरण

संत जनाबाई यांच्या अभंगांचे वर्गीकरण खालील प्रमाणे केलेले आढळते.

भक्तीपर अभंग - एकूण अभंग १५५, यामध्ये नाममहात्म्य, विठ्ठलमहिमा, भक्तिस्वरूप, आर्त भक्तीपर अभंग यांचा समावेश होतो.

परमार्थ जीवन - एकूण अभंग ५६, मनाचा निश्चय, आत्मस्वरूप स्थिती, मागणे अशा अभंगांचा समावेश होतो.

संतमहिमा - एकूण अभंग ४८, यामध्ये संतस्तुती, ज्ञानेश्वर स्तुती, सेना न्हावी आणि संत नामदेव यांच्या स्तुतीपर अभंगांचा समावेश होतो.

आख्यानपर रचना - एकूण अभंग ४५, यामध्ये हरिश्चंद्राख्यान, थाळीपाक, दशावतार, बालक्रीडा याचा समावेश होतो.

स्फुट काव्यरचना - एकूण अभंग ११, यामध्ये पाळणा, पदे, कूटरचना, आरती, जाते यांचा समावेश होतो.

हितवचने - एकूण अभंग ३२ - उपदेशवाणी आणि प्रारब्धगती यांचा समावेश होतो.

योगदान

०१) तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते.

०२) निवृत्ती, ज्ञानेश्वर या भावंडांमध्ये कोणाचे अभंग कोण उतरवून घेत असे असा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असणारा संदर्भ जनाबाई यांच्या अभंगामध्ये येतो. ''निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने l मुक्ताईची वचने ज्ञानदेवे ll'' असे त्या म्हणतात. तसेच ''नव्व्याण्णवाच्या सली मुक्ताई देखिली l जनी म्हणे केली मात त्यांनी l'' येथे शके १९९९ मध्ये मुक्ताबाईचा जन्म झाला हा ऐतिहासिक महत्त्वाचा संदर्भही त्यांच्या लिखाणात सहज येऊन जातो.

०३) ''सोsहम् आत्मा प्रगट जो दाखवी वाट l सदगुरू वरिष्ठ तोचि जाणा ll'' अशी एक प्रकारे सद्गुरूंची व्याख्याच जनाबाई करतात. नामदेव आणि ज्ञानदेव या दोघांच्या सहवासात आपल्याला सोsहम् साधनेचा मार्ग सापडला असे त्या म्हणतात.

वैष्णव कोणाला म्हणावे त्याचीही व्याख्या जनाबाई अगदी सहजपणे करून जातात. ''विष्णुमुद्रेचा अंकिला l तोचि वैष्णव भला ll अहं जाळोनी अंगारा l सोsहम् भस्मी तीर्थ सारा ll'' असे त्या म्हणतात. अहंकार जाळून त्याचा अंगारा बनविणारा आणि सोsहम् रुपी भस्म लावणारा तोच खरा भला वैष्णव होय असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

प्रबंध लेखन

संत जनाबाई: एक चिकित्सक अभ्यास (पीएच.डी प्रबंध), नेऊरगावकर मंजिरी, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई १९८९

संत जनाबाई: एक चिकित्सक अभ्यास, (एम.फील प्रबंधिका), मथुरे आसावरी सुधीर,१९८९

समाधी

संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)

जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट

  • ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)
  • संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; गंगाखेड, प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स) - प्रकाशन १९७६, ISBN 978-93-86401-43-4, या पुस्तकामध्ये जनाबाई यांच्या अभंगांचे संकलन केलेले आहे. एकूण ५४७ रचनांचा समावेश यामध्ये केला आहे.
  • संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन),
  • संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
  • संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)
  • संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)
  • संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])
  • संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])
  • संतचरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांनी लिहिलेल्या भक्त-विजय या ग्रंथामध्ये, (प्रकाशन १९५०) संत नामदेव यांच्या चरित्रात संत जनाबाई यांची माहिती आली आहे.
  • जनाबाई, आजगावकर जगन्नाथ रघुनाथ, महाराष्ट्र कविचरित्र, भाग पहिला, दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई, दुसरी आवृत्ती, १९२९
  • समर्थाची दासी संत जनाबाई, हेमंत विष्णू इनामदार, भक्तिपंथ : नवचिंतन, फडके बुकसेलर्स, कोल्हापूर, १९७७
  • संत जनाबाई : चरित्र व काव्य, नंदुरकर मो.द., १९७६
  • संत जनाबाई आणि मुक्तेश्वर, नांदापूरकर ना.गो. (म.म.पोतदार स्मारक ग्रंथ), १९५०एस.एन.
  • जनाबाईचा थालीपाक, ले.शिवराम महादेव परांजपे, भारत इतिहास संशोधक मंडळ, षण्मासिक वृत्त, पुणे १९१३
  • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, भवाळकर तारा, लोकवाङ्मय गृह, मुंबई, दुसरी आवृत्ती , २०१२
  • जनाबाईंचे निवडक अभंग, भालेराव इंद्रजित, प्रतिभास प्रकाशन, परभणी, १९९७

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

[[वर्ग:स्त्री चरित्रलेख}}

Tags:

संत जनाबाई जीवनसंत जनाबाई बालपणसंत जनाबाई विठ्ठल-भक्तीसंत जनाबाई अभंग-रचनासंत जनाबाई योगदानसंत जनाबाई प्रबंध लेखनसंत जनाबाई समाधीसंत जनाबाई जनाबाईंवरील पुस्तकेव्हीडिओचित्रपटसंत जनाबाई हे सुद्धा पहासंत जनाबाई संदर्भसंत जनाबाई बाह्य दुवेसंत जनाबाईमराठी लोकहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उचकीजय श्री रामचैत्रगौरीथोरले बाजीराव पेशवेपेशवेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशभारतीय रिझर्व बँकधनंजय चंद्रचूडस्वच्छ भारत अभियानसमासएकपात्री नाटकहस्तमैथुनचोळ साम्राज्यसुशीलकुमार शिंदेहिंगोली विधानसभा मतदारसंघचिमणीचातकविठ्ठलराव विखे पाटीलशहाजीराजे भोसलेबाबासाहेब आंबेडकरमराठी साहित्यमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबुद्धिबळजागतिक व्यापार संघटनाकबड्डीसुषमा अंधारेवर्धा विधानसभा मतदारसंघमराठवाडापृथ्वीभाऊराव पाटीलराजाराम भोसलेआकाशवाणीताराबाईनरेंद्र मोदीम्हणीमहाराष्ट्र गीतआंबासिंधु नदीकाळभैरवजवाहरलाल नेहरूनातीमुघल साम्राज्यनाथ संप्रदायशिवाजी महाराजसह्याद्रीन्यूटनचे गतीचे नियमहिरडाव्यापार चक्रबीड विधानसभा मतदारसंघजन गण मनलक्ष्मीयेसूबाई भोसलेभोपाळ वायुदुर्घटनामहाराष्ट्रातील खासदारांची यादीस्वरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजजेजुरीतलाठीसतरावी लोकसभामहाराष्ट्र शासनमतदाननामभारताची संविधान सभाकावळाआद्य शंकराचार्यजिजाबाई शहाजी भोसलेछत्रपती संभाजीनगर जिल्हापंचशीलशेकरूए.पी.जे. अब्दुल कलामनगदी पिकेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीजागतिकीकरणसुप्रिया सुळेरामटेक लोकसभा मतदारसंघविश्वजीत कदमकिशोरवय🡆 More