भाषालंकार

अलंकार म्हणजे कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा होय. मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.

भाषालंकार

अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत: १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दांच्या बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.

भाषालंकार

शब्दालंकारांच्या पाच जाती: वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, आणि पुनरुक्तवदाभास.

ह्या प्रत्येक जातीत उपजाती आहेत. उदाहरणार्थ, वक्रोक्तीच्या तीन जाती अशा: सभंगश्लेषवक्रोक्ति, अभंगश्लेष- वक्रोक्ति, काकुवक्रोक्ति.

यमक

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो. वेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात.

उदा० :

  • जाणावा तो ज्ञानी
    पूर्ण समाधानी
    निःसंदेह मनी
    सर्वकाळ
  • पहिला पाऊस पडला
    सुगंध सर्वत्र दरवळला
  • मना सज्जना भक्तीपंथेची जावे l

तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे l

  • सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो l

कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l

पुष्ययमक

  • सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
    कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.

दामयमक

  • आला वसंत कवि कोकिल हाही आला
    आलापितो सुचवितो अरुणोदयाला
  • पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
    देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
  • तल्लिले मधि तल्लीन न हो कल्लोलिनी! कवी कवण तरी?
    जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी

श्लेष

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा० :

  • सूर्य उगवला झाडीत...
    झाडूवाली रस्ता झाडीत...
    शिपाई गोळ्या झाडीत...
    अन् वाघहि तंगड्या झाडीत...

राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण

  • मला एस.टी. लागते. (गरज असणे/त्रास होणे)
  • हे मेघ, तू सर्वांना जीवन देतोस.(आयुष्य /पाणी)

अर्थश्लेष

वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा० :

  • तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच

सभंग श्लेष

उदा० :

  • श्रीकृष्ण नवरा मी नवरी
    शिशुपाल नवरा मी न-वरी
  • कुस्करू नका ही सुमने
    जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
  • ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
    औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

अनुप्रास

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा० :

  • गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
    शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले(नि)
  • रजनीतल स्थिर पल जल पल सलील
    हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.(ल)
  • पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी
    गळ्यामधे गरिबाच्या गाजे संतांची वाणी (ग)
  • बालिश बहु बायकात बडबडला

लाटानुप्रास

पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत 'नृसिंह पंचक स्तोत्र' हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. :

    नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
    प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें।
    खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
    तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।
    झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी।
    लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।
    हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी।
    कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।
    कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं।
    घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं।
    तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं।
    धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।
    भरभरित भरारी भर्भराटे भरारी।
    थरथरित थरारी थर्रथराटे थरारी।
    तरतरित तरारी तर्तराटे तरारी।
    चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।
    रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
    गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।
    न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
    हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

- श्रीसमर्थ रामदासस्वामी

भाषालंकार

उपमा

उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वस्तूला उपमेय आणि दुसऱ्या वस्तूला उपमान म्हणतात. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, परिस किंवा तत्सम शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. उदा०

  • सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी,

येथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान.

  • आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.
  • असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी.
  • मुंबई ची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.

उत्प्रेक्षा

उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

  • उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.

उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्‍न असतो.

उदा०

  • ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.

सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.

  • अत्रीच्या आश्रमी

नेले मज वाटे
माहेरची वाटे
खरेखुरे

  • बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।

उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ॥
~ बालकवी

  • हा आंबा जणू साखरच!
  • त्याचे अक्षर जणू काय मोतीच!
  • ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
  • आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!

(यमक व उपमा अलंकाराचे प्रत्यय जवळ जवळ सारखे असल्याने ओळखण्याची एक क्लृप्ती : यमक अलंकाराचे प्रत्यय शब्दाला जोडून येतात तर उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रत्यय न जोडता येतात .)

(** क्लृप्ती काही वेळेस चुकीची ठरू शकते **)

रूपक

रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो. तसेच उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.

उदा०

  • बाई काय सांगो

स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय

  • ऊठ पुरुषोत्तमा

वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळीकांसी

  • नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी
  • सांजफुले सोन्याहुनि पिवळे हे पडले ऊन
  • देह देवाचे मंदिर l आत आत्मा परमेश्वरll
  • वाघिणीचे दूध प्याला, वाघ बच्चे फाकडे ll

अपन्हुती

(अपन्हुती म्हणजे लपविणे/झाकणे)

अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो.

उदा०

हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल ।
हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.

अन्य उदाहरणे :-

  • हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले ।

ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे ।।

  • आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी

ती हाक येई कानी मज होय शोक भारी
नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी
... कवी यशवंत

  • हा आंबा नाही, ही साखरच आहे.(उपमेय-मूळ वस्तू, उपमान-उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू.)

अन्योक्ती

अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.

उदा०

  • येथे समस्त बहिरे बसतात लोक

का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
कोकील वर्ण बघुनि म्हणतील काक ।
... कृष्णशास्त्री चिपळूणकर

  • देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी ।
    शार्दूलादिक दुष्ट सर्व दडती गिर्यंतरी जाउनी ।

देशी ताप परि जसा वरिवरि येशी नभी भास्करा |
अत्युच्ची पदि थोरही बिघडतो हा बोल आहे खरा ।
... कृष्णशास्त्री चिपळूणकर

पर्यायोक्ती

  • एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.

उदा०

त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. (तुरुंगात आहेत)

विरोधाभास

एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.

उदा०

  • जरी आंधळी मी तुला पाहते
  • सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
  • मऊ मेणहूनी आम्ही विष्णूदास कठिण वज्रास भेदू ऐसे

व्यतिरेक

(विशेष स्वरूपाचा अतिरेक)

व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."

उदा०

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे) असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.

अन्य उदाहरणे-

  • कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
  • तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |

पाणियाहुनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।

  • सावळा ग रामचंद्र

रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो

  • देवाहुनही महान आहे माझी आई.

अतिशयोक्ती

अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच, पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.

उदा०

  • जो अंबरी उफळता खुर लागलाहे

तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे

  • काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
  • तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.
  • दमडीचं तेल आणलं, सासुबीचं न्हाणं झालं

मामांजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.

अनन्वय

अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे. उदा०

  • आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी.
  • या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.
  • झाले बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परंतु यासम हा l

भ्रान्तिमान

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.

उदा०

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी

भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.

ससंदेह

उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे. भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित असतो.

उदा०

कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा
~ मानू चंद्रमा कोणता?

दृष्टांत

एखादा विषय पटवून सांगताना दाखला (उदाहरण) देणे.

उदा०

  • लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा

ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार

  • चंदनाचे हात | पायही चंदन |

तुका म्हणे तैसा सज्जनापासून |
पाहता अवगुण | मिळेचिना ||
( संत तुकाराम)

  • निवडी वेगळे क्षीर आणि पाणी l राजहंस दोन्ही वेगळाली l

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे l येरागबाळाचे काम नव्हे ll

  • न कळता पद अग्नीवर पडे l न करी दाह असे न कधी घडे l

अजित नाम वदो भलत्या मिसे l सकळ पातक भस्म करितसे ll

अर्थान्तरन्यास

अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. (अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )

उदा०

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?

स्वभावोक्ती

एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

उदा०

गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी
म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधीन माडी
मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर जैसा गवई

चेतनगुणोक्ती

(चेतनाचे गुण सांगणारी उक्ती)

चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो.

उदा०

डोकी अलगद घरे उचलती । काळोखाच्या उशीवरूनी ।।

स्पष्टीकरण- काळोखाच्या उसवरून (निर्जीव) घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.

अन्य उदाहरणे-

  • चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा खंत करी , काही केल्या फुलेना ||[१]

  • मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे ।।
  • आला हा दारी उभा वसंत फेरीवाला,

पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला.

असंगती

कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन असते.

उदा०

कुणी कोडे माझे उकलिल का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला

सार

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.

उदा०

काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला
त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते

व्याजस्तुती

बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.

उदा०

होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती

व्याजोक्ती

(व्याज + उक्ती=खोटे बोलणे). एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे.

उदा०

येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुसे

भाषालंकार

वाच्यालंकारांच्या एकशे पाच जाती:

उपमा, अनन्वय, उपमेयोपमा, प्रतीप, रूपक, परिणाम, उल्लेख, स्सृतिमान्, भ्रांतिमान्, ससंदेह, अपन्हुति, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ति, तुल्ययोगिता, दीपक, प्रतिवस्तूपमा, दृष्टांत, निदर्शना, व्यतिरेक, विनोक्ति, समासोक्ति, परिकर, परिकरांकुर, श्लेष, अप्रस्तुतप्रशंसा, प्रस्तुतांकुर, पर्यायोक्त, व्याजनिंदा, व्याजस्तुति, आक्षेप, विरोधाभास, विभावना, विशेषोक्ति, असंभव, असंगति, विषम, विचित्र, अधिक, अल्प, अन्योन्य, विशेष, व्याघात, कारणमाला, एकावली, माला- दीपक, यशासंख्य, पर्याय, परिवृत्ति, परिसंख्या, विकल्प, समुच्चय, समाधि, प्रत्यनीक, काव्यार्थापत्ति, काव्यलिंग, अर्थांतरन्यास, विकस्वर, प्रौढोक्ति, संभावना, मिथ्याध्य- वसिति, ललित, प्रहर्षण, विषादन, उल्लास, अवज्ञा, अनुज्ञा, लेश, मुद्रा, रत्नावली, तद्गुण, पूर्वरूप, अतद्गुण, उत्कर्ष, मीलित, सामान्य, उत्तर, चित्र, सूक्ष्म, व्याजोक्ति, विवृतोक्ति, युक्ति, लोकोक्ति, छेकोक्ति, वक्रोक्ति, स्वभावोक्ति, भाविक, अत्युक्ति, निरुक्ति, प्रतिषेध, विधि, हेतु, रसवत्, प्रेयस्, ऊर्जस्वित्, समाहित, भावोदय, भावसंधि, भावशबलता.

भाषालंकार

३९ प्रकारचे वाक्यदोष:

शब्दशास्त्रहीन, क्रमभ्रष्ट, विसंधि, पुनरुक्तिमत्, व्याकीर्ण, वाक्यसंकीर्ण, भिन्नलिंग, भिन्नवचन, न्यूनोपम, अधिकोपम, भग्नछंद, विसर्गलुप्त, अस्थानसमास , वाच्यवर्जित, समाप्तपुनरात्त, संबंधवर्जित, पतत्प्रकर्ष, अधिकपद, अष्टार्धार्धबाहु, प्रक्रमभंग, अपूर्ण, वाक्यगर्भित, यतिभ्रष्ट, अशरीर, अरीतिक, प्रतिकूलवर्ण, उपहतविसर्ग, हतवृत्त, न्यूनपद, कथितपद, अर्धांतरैकवाचकपद, अभवन्मतयोग, अनभिहितवाच्य, अस्थानपद, संकीर्ण, गर्भित, प्रसिद्धिहत, अक्रम, अमतपदार्थ.

इसवी दहाव्या शतकातल्या मम्मटाचार्य ह्या "काव्यप्रकाश"नामक संस्कृत ग्रंथाच्या लेखकाने संस्कृतभाषानिरीक्षण/संशोधन करून तो ग्रंथ रचावा ही गोष्ट त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेचे निदर्शन करते. अर्थात वरचे सगळे शब्दालंकार आणि वाच्यालंकार मराठीसकट जगातल्या कुठल्याही भाषेला लागू आहेत. सगळे वाक्यदोषही जगातल्या पुष्कळ भाषांना लागू असणार.

संदर्भ

  • काव्यालङ्कारकोश:
  • सुगम मराठी व्याकरण : मो. रा. वाळिंबे
  • साहित्यविचार : अ. वा. कुळकर्णी
  • साहित्यविचार : लीला गोविलकर
  • भारतीय साहित्यशास्त्र : ग. त्र्यं. देशपांडे

Tags:

भाषालंकार शब्दालंकारभाषालंकार अर्थालंकारभाषालंकार वाच्यालंकार (किंवा अर्थालंकार)भाषालंकार वाक्यदोषभाषालंकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मेष रासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपवनदीप राजनमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेदेवनागरीभरती व ओहोटीआकाशवाणीशाहू महाराजचिन्मय मांडलेकरतुळजाभवानी मंदिरकल्की अवतारआंबेडकर जयंतीसाईबाबाविठ्ठलधनगरहोमरुल चळवळशिवाजी महाराजांचा जीवनक्रमभूकंपाच्या लहरीभारतीय संविधानाची उद्देशिकावस्तू व सेवा कर (भारत)ॐ नमः शिवायरशियन क्रांतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीचीनसूत्रसंचालनलॉर्ड डलहौसीगर्भाशयतापमानमराठीतील बोलीभाषाआळंदीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेजालना लोकसभा मतदारसंघआज्ञापत्रबीड लोकसभा मतदारसंघओशोखडकवासला विधानसभा मतदारसंघजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढवि.वा. शिरवाडकरभाऊराव पाटीलमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनजय श्री राममहाराष्ट्रातील स्थानिक शासननांदेड जिल्हारवी राणामृत्युंजय (कादंबरी)चाफाव्यंजनयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघराज ठाकरेमुलाखतकौटिलीय अर्थशास्त्रइस्लामलातूर लोकसभा मतदारसंघशनिवार वाडाअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीअध्यक्षफुफ्फुसनिलेश लंकेलोकसभाप्राथमिक शिक्षणगुरुत्वाकर्षणसंगणक विज्ञानजागतिक लोकसंख्याराणी लक्ष्मीबाईगजानन महाराजआत्महत्यायेसूबाई भोसलेशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीझाडकोरेगावची लढाईनृत्यमहालक्ष्मीभारतीय संविधानाचे कलम ३७०मण्यारहनुमान जयंतीबहिष्कृत भारत🡆 More