हिंदू धर्मातील अंतिम विधी

मानवी जन्माच्या आधीपासून( गर्भाधान संस्कार) ते त्याच्या मृत्यूनंतरही ( दाहकर्म व श्राद्ध) केले जाणारे संस्कार हिंदू  जीवनशैलीत प्रचलित आहेत.

दिवंगताविषयी आस्था,प्रेम , सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म  व श्राद्ध या विधीकडे पाहिले पाहिजे  असे वाटते. 

भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या वैदिक साहित्यात ;मृत्यूनंतर केल्या जाणा-या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ  आढळतात.दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे. 

दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे.जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले आहे. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा. 

एके काळी अंत्येष्टीत(मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कार)पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :

द्वि व त्रिपुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर श्राद्धविधी करावा.

अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस.या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने.आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.

भाग १

नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो. 

 आरंभीचे क्रियाकर्म, क्रियाकर्म कोणी करावे, क्षौरविधी, दहनविधीची सिद्धता, अंत्ययात्रा इत्यादींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवसापर्यंत करावयाच्या महत्त्वाच्या कृती

व्यक्तीच्या मृत्यूनंतर धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे क्रियाकर्म पुरोहिताकडून करून घ्यायचे असते. बहुतेक ठिकाणी अंत्यसंस्कारांविषयी ज्ञान असणारा पुरोहित लगेच मिळणे कठीण असते. अशा वेळी सर्वसाधारणतः कोणत्या कृती करायच्या असतात, ते पुढे दिले आहे. यांपैकी काही कृतींमध्ये पाठभेद, तसेच प्रांतानुसार / परंपरेनुसार भेद (फरक) असू शकतात. जेथे असे भेद आढळतील तेथे आपल्या पुरोहितांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

मृत्यूनंतर करण्यात येणारे आरंभीचे क्रियाकर्म

 क्रियाकर्मासाठी पुढील साहित्य गोळा करणे

१. बांबू,

२. सुंभ, म्हणजे काथ्याची दोरी (एक किलो),

३. एक लहान आणि एक मोठे मडके,

४. मृतदेह झाकण्याएवढे पांढरे कापड,

५. तुळशीचा हार,

६. तुळशीच्या मुळातील माती,

७. २५० ग्रॅम काळे तीळ,

८. ५०० ग्रॅम तूप,

९. दर्भ,

१०. १०० ग्रॅम कापूर ,

११. काडीपेटी,

१२. सातूच्या / तांदळाच्या पिठाचे ७ गोळे,

१३. पळी-पंचपात्री, तांब्या आणि ताम्हण,

१४. आंबा-फणस यांची लाकडे,

१५. कोयती,

१६. भस्म / विभूती,

१७. गोपीचंदन,

१८. चंदनकाष्ठ,

१९. गोवर्या,

२०. १ वाटी पंचगव्य ( गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप यांचे मिश्रण),

२१. सोन्याचे ७ तुकडे.

 मृताला अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल, तर धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे. तोही नसेल, तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा, जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते. क्रियाकर्म करणाऱ्या पुरुषाला ‘कर्ता’ म्हणतात.

अविवाहित पुरुष / स्त्री, तसेच निपुत्रिक व्यक्ती आदींचे क्रियाकर्म अनुक्रमे त्यांचा पाठचा भाऊ, वडील किंवा मोठा भाऊ, नाहीतर आप्तेष्ट यांना करता येते.

 व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो लगेचच तिचे हात-पाय आणि मान सरळ करावी. डोळे बंद करावेत. त्यानंतर काही काळाने असे करणे कठीण असते.

 व्यक्तीच्या मृत्यूनंतर आक्रोश करणे, उर बडवणे यांसारख्या कृती करू नयेत.

 घरातील व्यक्तींनी मृत व्यक्तीच्या लिंगदेहाचे

वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून (हल्ल्यांपासून) रक्षण होण्यासाठी मधूनमधून दत्ताला प्रार्थना करावी – ‘हे दत्तात्रेया, ….(मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) यांच्या लिंगदेहाभोवती तुझे संरक्षक-कवच सतत असू दे. त्यांना पुढची पुढची गती द्यावी, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

 ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा दत्ताचा नामजप करीत पुढील सर्व क्रियाकर्म करावे.

 मृतदेहाला भूमीवर ठेवण्यापूर्वी भूमी शेणाने सारवावी. ते शक्य नसल्यास भूमीवर गोमय किंवा विभूती यांचे पाणी शिंपडावे. भूमीवर दर्भ पसरून त्यावर गवती चटई, घोंगडी, रग किंवा धाबळी अंथरून त्यावर मृतदेह दक्षिणोत्तर ठेवावा (झोपवावा). मृतदेहाला दक्षिणोत्तर ठेवतांना त्याचे पाय दक्षिणेकडे करावेत.

मृतदेह दक्षिणोत्तर ठेवावा

मृतदेहाच्या सभोवती अप्रदक्षिणेने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेने) थोडेसे अंतर ठेवून भस्म किंवा विभूती घालावी.

 मृत्यूपूर्वी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले नसल्यास मृतदेहाच्या तोंडात गंगाजल घालून तोंड बंद करून त्यावर तुळशीपत्र ठेवावे. तसेच त्याचे कान आणि नाक यांत कापसापेक्षा तुळशीच्या पानांचा एकत्रित तुरा ठेवून ते बंद करावेत.

 मृतदेहाच्या डोक्यापासून काही अंतरावर भिजवलेल्या गव्हाच्या पिठाच्या (कणकेच्या) गोलावर एकच वात असणारी तेलाची पणती / निरांजन / समयी लावून ठेवावी. त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करावी.

मृतदेह तेथून हलवल्यानंतरही हा दिवा पुढे दहाव्या दिवसापर्यंत तेवत ठेवावा.

कर्त्याने क्षौर करावे (डोक्यावरचे केस पूर्णपणे काढावेत.), तसेच दाढी-मिशा काढून नखेही कापावीत. क्षौर करतांना बटूप्रमाणे केसांचा घेर न ठेवता केवळ शेंडी ठेवावी.

कर्त्याचे अन्य भाऊ, तसेच मृत व्यक्तीपेक्षा लहान असलेले कुटुंबीय (ज्यांचे वडील विद्यमान नाहीत असे) यांनीही त्याच दिवशी क्षौर करावे. ते शक्य नसल्यास दहाव्या दिवशी क्षौर करावे.

कर्ता मृत व्यक्तीपेक्षा वयाने मोठा असल्यास त्याने क्षौर करू नये.

 सूर्यास्तानंतर क्षौर वर्ज्य असल्याने सूर्यास्तानंतर क्षौर करू नये. अशा वेळी मृताची उत्तरक्रिया (प्रतिदिन करावयाचे पिंडदान अन् द्यावयाची तिलांजली) ज्या दिवशी चालू करणार त्या दिवशी कर्त्याने क्षौर करून उत्तरक्रिया आरंभ करावी. इतरांनी १० व्या दिनी क्षौर करावे.

स्त्रियांनी केस किंवा नखे कापू नयेत.

 कर्त्याने स्नान करावे आणि कोरे वस्त्र, उदा. धोतर नेसावे. अंगावर उपरणे घेऊ नये.

 मृत व्यक्तीपेक्षा लहान असणाऱ्या कुटुंबियांनी आणि नातेवाइकांनी मृतदेहाला नमस्कार करावा.

 मृतदेहास घराच्या पुढील अंगणात नेऊन तेथे त्याचे पूर्वेस डोके आणि पश्चिमेस पाय करून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मोठ्याने करत कर्त्याने त्याला आंघोळ घालावी.

 आंघोळ घालणे शक्य नसल्यास पायांवर पाणी घालावे.

 नंतर एकदा पंचगव्यस्नान (गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप एका फुलपात्रात एकत्रित करावे. त्यात दर्भ ठेवून पाणी घालावे. ते मिश्रण तो दर्भ किंवा तुळशीपत्र यांच्या साहाय्याने मृतदेहावर शिंपडणे), तसेच मस्तकापासून पायांपर्यंत १० वेळा मातीचे स्नान (पाण्यात तुळशीच्या मुळातील माती घालून ते पाणी मृतदेहावर शिंपडणे) घालावे.

 गोपीचंदन आणि भस्म / विभूती मृतदेहास लावावी. गळ्यात तुळशीचा हार घालावा.

टीप – प्रत्येकाने मृतदेहाला पुष्पमाला, तसेच त्याच्या तोंडात साखर घालण्याची आणि कपाळावर कुंकू वहाण्याची पद्धत बऱ्याचं ठिकाणी आढळते. असे करणे शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे.

 आंघोळ घातल्यानंतर मृतदेहास नवीन वस्त्रे (धोतर-अंगरखा (सदरा) किंवा साडी) घालावीत. ही वस्त्रे धुपवून (वस्त्रे धुपावर धरून) किंवा गोमूत्र वा तीर्थ शिंपडून शुद्ध केलेली असावीत.

कुमारिकेचा मृत्यू झाल्यास तिला पांढऱ्या रंगा-व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रंगाचे पातळ (लुगडे) नेसवावे.

सुवासिनीच्या मृत्यूनंतर 

 नवीन हिरवी साडी नेसवावी.

 काचेच्या हिरव्या बांगड्या भराव्यात आणि केसांत फुलांची वेणी घालावी.

 मळवट भरावा. अन्य सुवासिनींनी मृत सुवासिनीला हळदी-कुंकू लावावे.

मृतदेह चटई / अन्य अंथरूण यावर ठेवावा. पावले उघडी ठेवून उर्वरित मृतदेह अखंड कोर्या पांढऱ्या वस्त्राने झाकावा. मुखमंडलावरील वस्त्राच्या भागाला छेद देऊन मुख (चेहरा) उघडे ठेवावे. पायाकडील वस्त्राचा भाग (एकूण वस्त्राच्या एक चतुर्थांश भाग) कापून कर्त्याने त्याचा उत्तरीय (उपरणे) म्हणून १२ व्या दिवसापर्यंत वापर करावा. हे उत्तरीय हरवू नये. हे वस्त्र १२ व्या दिवशी सपिंडीविधीत पिंडांच्या ठिकाणी ठेवतात आणि पिंडांसह विसर्जित करतात.

 अन्य सूचना

 पती मृत झाल्यास पत्नीने मंगळसूत्रातील मुहूर्तमणी, तसेच सोन्याच्या तारेत गुंफलेले काळे मणी वेगळे करून ते पतीच्या मृतदेहासमवेत चितेत ठेवण्यासाठी द्यावेत. मंगळसूत्रातील अन्य सुवर्ण अन् सौभाग्यालंकार काढून सुरक्षित ठेवावेत.

मृतदेह अधिक काळ ठेवू नये. काही कारणास्तव तो ठेवावा लागल्यास त्याच्या भोवती दत्ताच्या नामजपपट्ट्यांचे मंडल करावे. तसेच घरात दत्ताचा नामजप किंवा संतांनी गायलेली भजने चालू ठेवावीत. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप उपस्थितांनीही सातत्याने करावा.

मृतदेहाचे दहन शक्यतो दिवसा करावे.

१३ व्या दिवसापर्यंत सर्व कुटुंबियांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत करावा. 

 मृतदेहाला कोणीही अनावश्यक स्पर्श करू नये.

 ३ वर्षांपर्यंतचा मुलगा-मुलगी मृत झाल्यास त्यांच्या संदर्भात कोणताही धार्मिक विधी केला जात नाही. त्याचा / तिचा मृतदेह पुरावा.

दहनविधीची सिद्धता

 तिरडी बांधणे

 तिरडी, तसेच अग्नीचे मडके ठेवण्यासाठी कामट्या (पट्ट्या) बनवण्याकरिता बांबूचा वापर करावा.

तिरडी बनवण्यासाठी बांबूचे सर्वसाधारणपणे ६ फुटांचे दोन तुकडे करून भूमीवर आडवे ठेवावेत. त्या दोहोंत सर्वसाधारणपणे दीड फुटांचे अंतर ठेवून त्यांवर बांबूच्या कामट्या मध्ये मध्ये बांधाव्यात. कामट्या बांधतांना सुंभ कोठेही कापू नये. प्रत्येक अंगाला (बाजूला) उरणारे सुंभ मृतदेह तिरडीवर ठेवल्यानंतर तो तिरडीला बांधण्यासाठी वापरावेत.

अग्नी ठेवलेले मडके घेऊन जाण्यासाठी बांबू चिरून त्याच्या तीन कामट्या (पट्ट्या) काढाव्यात. अग्नीचे मडके मावेल, एवढ्या त्रिकोणी आकारात त्या बांधाव्यात.

बांधून झालेली तिरडी घराबाहेर, उदा. अंगणात पूर्व-पश्चिम ठेवावी.

 मृत व्यक्तीच्या निवासस्थानी होणारे सर्व सोपस्कार झाल्यावर मृतदेह तिरडीवर पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून ठेवावा.

 मृतदेहाच्या दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना बांधावेत.

 तिरडीच्या टोकांना असलेल्या सुंभाच्या साहाय्याने मृतदेह तिरडीला बांधावा.

मृताने वापरलेले कपडे आणि अंथरुण-पांघरुण अंत्ययात्रेसमवेत घेऊन जावे. ते साहित्य चितेत ठेवावे.

 अंत्ययात्रा

अंत्ययात्रेमध्ये कर्त्याने पुढे रहावे. त्याने गोवर्या घालून त्यावर निखारे किंवा कापूर यांच्या साहाय्याने अग्नी पेटवलेले मडके उजव्या हातात घ्यावे.

कर्त्याने डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेले मडके घ्यावे. शारीरिक क्षमतेअभावी कर्त्याला पाण्याचे मडके घेणे त्रासदायक होत असल्यास ते अन्य व्यक्तीकडे द्यावे.

 कुटुंबियांनी, नाहीतर नातेवाइकांनी, तेही उपस्थित नसल्यास शेजार्यांनी तिरडी उचलावी आणि कर्त्याच्या मागून जावे. तिरडीला चौघांनी खांदा द्यावा.

कर्ता आणि तिरडी यांच्यामध्ये कोणीही असू नये. सर्वांनी तिरडीच्या मागून जावे.

अंत्ययात्रेमध्ये मृतदेहाचे डोके पुढील दिशेस करावे.

अंत्ययात्रा स्मशानात पोहोचेपर्यंत सर्वांनी मोठ्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ किंवा "राम नाम सत्य है "हा नामजप करावा.

 अंत्ययात्रा अर्ध्या वाटेवर, नाहीतर स्मशानाच्या प्रवेशद्वाराबाहेर पोहोचल्यावर तिरडी खाली ठेवावी. कर्त्याने हातातील साहित्य खाली ठेवून सातू / तांदूळ यांच्या पिठाचे दोन पिंड द्यावेत. हे पिंड घरातून करून आणले तरी चालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ घालावेत. मृतदेहाच्या उजवीकडे अन् डावीकडे दर्भावर पिंड ठेवावेत. उजवीकडील पिंडावर ‘श्यामाय अयं पिण्ड उपतिष्ठतु ।’ असे म्हणून उजव्या हाताच्या पितृतीर्थाने (अंगठा आणि तर्जनी यांच्यामधील तळहाताच्या स्थानावरून) तिळमिश्रित पाणी सोडावे. नंतर डावीकडील पिंडावर शबलाय अयं पिण्ड उपतिष्ठतु ।’ असे म्हणून त्याच्यावरही वरीलप्रमाणे तिळमिश्रित पाणी सोडावे.

त्यानंतर मागचे खांदेकरी पुढे आणि पुढचे खांदेकरी मागे, असा पालट करून तिरडी उचलावी अन् पुढे न्यावी.

भाग २

स्मशानात पोहोचल्यावर तिरडीसह मृतदेह चितेवर ठेवतांना मृताचे पाय उत्तर दिशेला आणि डोके दक्षिण दिशेला येईल, असे करावे.

तिरडीचे सर्व सुंभ आणि बांबू सोडवावेत. ते सर्व साहित्य चितेवरच ठेवावे.

 मृतदेहाच्या पायांचे अंगठे सोडवावेत.

चिता प्रज्वलित करण्यापूर्वीचे विधी

 मृत व्यक्तीचे मुख, दोन्ही नाकपुड्या आणि कान यांत, तसेच डोळे यांवर सोन्याचे तुकडे घालावेत / ठेवावेत. सोन्याचे तुकडे घालणे शक्य नसल्यास दर्भाच्या अग्राने किंवा तुळशीच्या पानाने तुपाचे थेंब घालावेत.

कर्त्याने अग्नीचे मडके चितेच्या वायव्य दिशेला ठेवावे आणि त्यातील अग्नी प्रज्वलित करावा.

 ‘क्रव्यादनामानमग्निं प्रतिष्ठापयामि ।’ असे म्हणून त्या अग्नीवर काळे तीळ घालावेत. (काही जण मृतदेहाच्या वायव्य दिशेला भूमीवर मातीची त्रिकोणी वेदी बनवतात अन् त्यात गोवर्यांवर मडक्यातील अग्नी ठेवून तो प्रज्वलित करतात.) त्यावर पळीने पुढीलप्रमाणे तुपाच्या आहुत्या द्याव्यात. प्रत्येक वेळी पुढील एकेक मंत्रातील ‘स्वाहा’ म्हणतांना आहुती द्यावी आणि नंतर ‘…. इदं न मम ।’असे म्हणावे.

अग्नये स्वाहा । अग्नय इदं न मम ।।

कामाय स्वाहा । कामाय इदं न मम ।।

लोकाय स्वाहा । लोकाय इदं न मम ।।

अनुमतये स्वाहा । अनुमतय इदं न मम ।।

यानंतर ‘ॐ अस्माद्वैत्वमजायथा अयं त्वदभिजायताम् । असौ….(मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) प्रेताय स्वर्गाय लोकाय स्वाहा ।।’ असे म्हणून तुपाची आहुती मृतदेहाच्या छातीवर द्यावी आणि ‘…. (मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) प्रेताय इदं न मम ।’ असे म्हणावे.

मृत व्यक्तीचे कपाळ, मुख, दोन्ही बाहू आणि छाती या पाच ठिकाणी सातूच्या / तांदळाच्या पिठाचे सुपारीएवढ्या आकाराचे गोळे ठेवावेत. प्रत्येक गोळ्यावर तूप घालावे.

दहनविधी

 उपस्थितांनी मृतदेहावर चंदनकाष्ठ, अन्य लाकूड, उदबत्ती किंवा कापूर ठेवावा. ही कृती शास्त्रात नसून ती लौकिक पद्धत आहे.

 आणलेल्या अग्नीच्या साहाय्याने कर्त्याने चितेला अग्नी द्यावा.

 प्रथम मृतदेहाच्या (पुरुष असल्यास) डोक्याकडे किंवा (स्त्री असल्यास) पायाकडे आणि त्यानंतर अप्रदक्षिणेने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने) फिरत चारही अंगांनी (बाजूंनी) चिता प्रज्वलित करावी. त्यासाठी आणलेल्या अग्नीवर माडाची एखादी झावळ पेटवून घ्यावी.

 चितेमध्ये ‘टायर’सारख्या वस्तूंचा वापर टाळावा. रॉकेलचा वापर करावयाचा झाल्यास तो अत्यल्प करावा.

शक्यतो चितेचा धूर आपल्या अंगाला लागू देऊ नये.

मृतदेहाचा कपाळमोक्ष झाल्यानंतर (कवटी फुटल्याचा ध्वनी ऐकू आल्यानंतर) कर्त्याने खांद्यावर पाण्याचे मडके घेऊन मृत व्यक्तीच्या पायांकडे दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने कर्त्याच्या मागे उभे राहून स्मशानातीलच लहान दगडाने (या दगडाला ‘अश्मा’ असे म्हणतात.) त्या मडक्याच्या गळ्याच्या खाली एक भोक पाडावे. कर्त्याने मडक्यातील पाणी सांडवित चितेभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पहिली प्रदक्षिणा घालावी. दुसऱ्याने परत मडक्याला पहिल्या भोकाच्या खाली दुसरे भोक पाडावे. यानंतर कर्त्याने आधीसारखीच दुसरी प्रदक्षिणा घालावी. यानंतर दुसऱ्याने परत मडक्याला दुसऱ्या भोकाच्या खाली तिसरे भोक पाडावे. कर्त्याने आधीसारखीच तिसरी प्रदक्षिणा घालावी. तिसऱ्या प्रदक्षिणेनंतर मृत व्यक्ती पुरुष असल्यास त्याच्या डोक्याकडे मृतदेहाला पाठ करून आणि मृत व्यक्ती स्त्री असल्यास तिच्या पायांकडे मृतदेहाला पाठ करून कर्त्याने उभे रहावे अन् मागे न पहाता मडके खांद्यावरून मागच्या अंगाला टाकून फोडावे.

‘हल्लीच्या काळात अंत्यसंस्कार करतांना काही ठिकाणी चितेत लाकडांसोबतच टायर, रॉकेल, इत्यादी साधनांचा वापर केला जातो. धर्मशास्त्रानुसार अंत्यसंस्कारासाठी शक्यतो लाकूड, गोवर्यात, तूप, कापूर, उदबत्ती, धूप इत्यादी सात्त्विक वस्तू वापराव्यात. तुपाचा वापर करणे शक्य नसल्यास तेलाचा वापर करू शकतो. 

टायर लाकडापेक्षा जास्त वेळ जळते, कुठेही सहज उपलब्ध होते आणि आर्थिकदृष्ट्या परवडते. त्यामुळे सध्याच्या काळात अंत्यसंस्कार करतांना टायर, रॉकेल इत्यादी वस्तूंचा वापर केला जातो. टायर, रॉकेल इत्यादी वस्तू तमोगुणी आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे वातावरण तमोगुणी होते.

टीप – सध्याच्या काळात चितेला अग्नी देऊन झाल्यावर लगेचच वरील कृती करतात.

 कर्त्याने मडक्याला भोक पाडण्यासाठी वापरलेला अश्मा सुरक्षितपणे घरी आणावा.

महत्त्वाचे - घरी आल्यावर अत्यंत सफाईपणे स्नान करावे, स्नान करण्यामागे एक महत्त्वाचे शास्त्रीय कारण Archived 2020-10-07 at the Wayback Machine. आहे

लहान मुलांचा अंत्यसंस्कार कसा करावा ?

‘मृत्यूनंतर लहान मुलांचा देह पुरावा (त्याचे खनन करावे) आणि वयोवृद्धांचा (मोठ्या व्यक्तींचा) देह दहन (अग्नीसंस्कार) करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे. लहान मुलांच्या अंत्यसंस्काराविषयीची सूत्रे आणि त्यांविषयीचे शास्त्र पुढे दिले आहे.

 नामकरणापूर्वी (१२ व्या दिवसापर्यंत) बालकाचा मृत्यू झाल्यास खनन करावे. (देह पुरावा.)

चौलसंस्कार झालेल्या अथवा न झालेल्या ३ वर्षांपर्यंतच्या बालकाचे मृत्यूनंतर दहन किंवा खनन यांपैकी काहीही केलेले चालते. असे असले, तरी २ वर्षे पूर्ण न झालेल्यास मृत्यूनंतर पुरणे जास्त योग्य, तर २ वर्षे पूर्ण झालेल्यास मृत्यूनंतर दहन करणे जास्त योग्य होय. (संदर्भ : धर्मसिंधु, पृष्ठ ६०८ आणि ६०९)

लहान मुलाचा मृतदेह का पुरतात  आणि

वयोवृद्धांच्या मृतदेहाचे दहन का करतात ?

‘स्थूलदेह हा पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतो. २ वर्षांपूर्वीच्या बालकाचा स्थूलदेह कोवळा असतो. त्यामुळे तो स्थूलदेह (पृथ्वीतत्त्व) मातीत (पृथ्वीतत्त्वात) सहज मिसळू शकतो, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे स्थूल आणि सूक्ष्म देहांचे जडत्वही वाढत जाते. देह पुरल्यास त्याचे पंचतत्त्वात विघटीकरण होणे कठीण असते. मृत्यूनंतर स्थूलदेह दहन केल्याने त्याची राख होते. ही राख मातीत सहज मिसळते, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते.

 दहनविधीनंतर त्याच दिवशी करायचा  विधी

 शास्त्रानुसार पद्धत

दहनविधीनंतर लगेचच नदी, तलाव किंवा विहीर येथे नामजप करत कर्त्यासह कुटुंबियांनीही स्नान करावे.

 कर्त्याने तिलांजली देण्यासाठी एका भांड्यात पाणी घालून त्यात काळे तीळ घालावेत. त्यानंतर तेथेच कर्ता, कुटुंबीय आणि आप्तेष्ट यांनी

 ‘….गोत्र (मृत व्यक्तीचे गोत्र उच्चारावे.) ….प्रेत (मृत व्यक्तीचे नाव उच्चारावे.) एष ते तिलतोयाञ्जलिस्तवोपतिष्ठताम् ।’

, असे म्हणत अश्म्यावर पितृतीर्थावरून ३ वेळा तिलांजली द्यावी. ज्यांचे वडील विद्यमान आहेत, अशांनी तिलांजली देऊ नये.

 घरी आल्यावर आधी अश्मा अंगणातील तुळशी-वृंदावनाच्या परिसरात ठेवावा; मात्र तुळशीत ठेवू नये. तुळशीवृंदावन नसल्यास अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

 घरात प्रवेश करण्याआधी कडुनिंबाचे पान चावावे. मग आचमन करून अग्नीचे दर्शन घेऊन, तसेच पाणी, गोमय, पांढरी मोहरी आदी मांगलिक पदार्थांना हाताने स्पर्श करून, त्यानंतर दगडावर (घराच्या दगडी पायरीवर चालेल.) पाय ठेवून हळूहळू घरात प्रवेश करावा.

 जेवणासाठी शेजारच्या घरी पिठले-भात करून तो मृत व्यक्तीच्या घरी आणावा. त्यातील थोडासा भाग एका पानावर घेऊन तो नैवेद्य म्हणून वास्तुदेवता आणि स्थानदेवता यांच्यासाठी घराबाहेर ठेवावा. उर्वरित अन्न इष्टदेवतेला अर्पण करून नंतर सर्वांनी ग्रहण करावे.

 शास्त्रानुसार बाहेर स्नान करणे शक्य नसल्यास आचरायची पद्धत

 घरी आल्यावर आधी अश्मा अंगणातील तुळशी-वृंदावनाच्या परिसरात ठेवावा; मात्र तुळशीत ठेवू नये. तुळशीवृंदावन नसल्यास अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

 घरात प्रवेश करण्याआधी सर्वांगावर गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी.

 कडुनिंबाचे पान चावावे… हळूहळू घरात प्रवेश करावा. – ही कृती वर उल्लेखल्याप्रमाणे करावी.

 नामजप करत सर्वांनी स्नान करावे.

 वर उल्लेखल्याप्रमाणे तिलांजली द्यावी.

 जेवणासाठी शेजारच्या घरी पिठले-भात….. ग्रहण करावे. – ही कृती वर उल्लेखल्याप्रमाणे करावी.

 अस्थीविसर्जन

दाहसंस्कार केलेल्या दिवशी किंवा मृत झाल्याच्या तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी गोळा करून त्यांचे दहा दिवसांच्या आत विसर्जन करावे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करणे अधिक चांगले असते. दहा दिवसांनंतर अस्थीविसर्जन करायचे असल्यास तीर्थश्राद्ध करून विसर्जन करावे.

 पिंडदान

शास्त्रानुसार पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत प्रतिदिन तिलांजली, पिंडदान, तसेच विषम दिवशी विषम श्राद्ध करावे. असे शक्य नसल्यास निदान नवव्या दिवसापासून उत्तरक्रिया चालू करावी. मात्र आजकाल पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंतचे पिंडदान दहाव्या दिवशी एकत्रच करतात. दहाव्या दिवशी नदीकाठच्या किंवा घाटावरच्या शिवाच्या किंवा कनिष्ठ देवतांच्या देवळांत पिंडदान करावे. दहाव्या दिवशी पिंड देऊन झाल्यावर अश्म्यावर थोडेसे खोबरेल तेल घालून तो विसर्जित करावा.

 ११ व्या आणि १२ व्या दिवशी करावयाचा विधी

११ व्या दिवशी स्नान झाल्यानंतर वास्तूत पंचगव्य होम करून सर्वत्र पंचगव्य शिंपडावे. सर्वांनी पंचगव्य प्राशन करावे. कर्त्याने मृताच्या उद्देशाने संकल्प करून आमान्न (शिधा), तसेच दशदाने आदी द्यावीत. घराच्या बाहेर, गोठ्यात किंवा अन्यत्र एकोद्दिष्ट श्राद्ध, तसेच वसुगण श्राद्ध आणि रुद्रगण श्राद्ध करावे. 

सपिंडीकरण श्राद्ध

सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धे सपिंडीकरण श्राद्धापूर्वी ११ व्या किंवा १२ व्या दिवशी करावीत. १२ व्या दिवशी सपिंडीकरण श्राद्ध करावे. सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला ‘पितृ’ ही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते. खरे पहाता १६ मासिक श्राद्धे त्या त्या मासात करणे आणि सपिंडीकरण श्राद्ध वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी करणे उचित ठरते; पण आजकाल हे सर्व १२ व्या दिवशीच करायचा प्रघात आहे.

निधन शांतीविधी (शांतोदक)

१३ व्या दिवशी पाथेय श्राद्ध करून निधन शांतीविधी करावा. सर्वांना बोलावून गोड जेवण द्यावे. आजकाल हा विधी १२ व्या दिवशीच केला जातो.

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर 'गरूड पुराण' का वाचतात?

मृत्यू हा अटळ आहे,तो कोणालाही चुकलेला.जन्म-मृत्युचे चक्र हे अविरत सुरूच असते.जन्मझाल्यापासून मृत्यूपर्यंत व्यक्तिला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात.हिंदू धर्मात काही परंपरा आहेत.त्यांचे प्रत्येक व्यक्तिने पालन करणे आवश्यक असते.परंतु आपल्या मृत्यूनंतर काही परंपरा या आपल्या कुटुंबियांकडून पूर्ण केल्या जातात.परंपरेनुसार आपल्या कुटूंबातील सदस्याचा मृत्यु झाल्यानंतर'गरुड पुराण'चे वाचले जाते.ब्राह्मणांकडून गरुड पुराण वाचले जाते आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून ते श्रवण केले जाते. 

गरुड पुराणामध्ये जन्म-मृत्युशी निगडीत असलेली माहिती सांगण्यात आली आहे.जन्म-मृत्यूबाबत आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उकलही त्यातून करून देण्यात आली आहे.त्यामुळे घरातील सदस्याच्या मृत्युनंतर गरुड पुराणाचे ज्ञान दिले जाते.जीवनात प्रत्येकाने सत्कर्म करावे,हे त्याद्वारे सांगितले जाते.

मृत पावलेल्या व्यक्तिच्या आत्म्यास शांती मिळावी व त्याला लवकर मोक्ष प्राप्त व्हावा,या उद्देशाने गरुड पुराणाचे वाचन दहाव्याच्या कार्यक्रमापर्यंत केले जाते.शास्त्रानुसार दहाव्याच्या कार्यक्रमापर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आत्मा त्याच घरात राहत असतो.गरुड पुराणानुसार व्यक्तिने केलेल्या चांगल्या कर्माचे फळ त्याला मृत्यूनंतरही मिळत असते.

गरुड पुराण दहा दिवसांत वाचल्यावर तो आत्मा ते ऐकत असतो व त्या योगे आत्म्याला सर्व जन्म मृत्यूचे ज्ञान प्राप्त होते व  पुढील प्रवास सुखकर होतो व मुक्ती मिळते असा समज आहे .

Tags:

हिंदू धर्मातील अंतिम विधी भाग १हिंदू धर्मातील अंतिम विधी भाग २हिंदू धर्मातील अंतिम विधी लहान मुलांचा अंत्यसंस्कार कसा करावा ?हिंदू धर्मातील अंतिम विधी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिखर शिंगणापूरध्वनिप्रदूषणराम गणेश गडकरीवासुदेव बळवंत फडकेरायगड (किल्ला)प्रतापगडशब्दयोगी अव्ययभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशपंढरपूरबारामती विधानसभा मतदारसंघफणसवर्णमालाव्यापार चक्रपरभणी लोकसभा मतदारसंघनैसर्गिक पर्यावरणभारूडसोलापूरजयंत पाटीलभारतातील शेती पद्धतीशेतकरीप्रल्हाद केशव अत्रेपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्रातील किल्लेराष्ट्रवादउदयनराजे भोसलेबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरगौतम बुद्धस्वामी समर्थभारतीय संसदक्षय रोगमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासुरेश भटपंचशीलतबलाकिरवंतभारतीय आडनावेजागतिक तापमानवाढउष्माघातउत्तर दिशाक्रियाविशेषणकृत्रिम बुद्धिमत्ताविदर्भातील पर्यटन स्थळेबारामती लोकसभा मतदारसंघभगवद्‌गीताभारतातील मूलभूत हक्ककाळाराम मंदिरमहाराष्ट्र केसरीमधुमेहपृथ्वीथोरले बाजीराव पेशवेफ्रेंच राज्यक्रांतीमहाराष्ट्र विधानसभामहाड सत्याग्रहधनुष्य व बाणपेशवेमोरकडुलिंबवृत्तपत्रसावता माळीओटभारतीय रिपब्लिकन पक्षभारतातील सण व उत्सवदशावतारप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)बुद्धिबळपर्यावरणशास्त्रचेतापेशीविमाकर्ण (महाभारत)विजयादशमीबुलढाणा जिल्हाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजय भीमसूत्रसंचालनअन्नप्राशन🡆 More